आज ‘या’ मार्गावरून निघणार श्रीराम वहनोत्सवात शेषनागाचे वहन
जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । श्रीराम वहनोत्सवात बुधवारी शेषनागाचे वहन आहे. शेषनाग हा सर्पकुळाचा अनभिषिक्त सम्राट आहे. संपूर्ण पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण करणारा शेषनाग प्रत्येकाला आपल्या वाट्याला आलेले कर्तव्याचे पालन करण्याचा संदेश देतो. भगवान विष्णूंचे शय्यास्थान होण्याचे भाग्य शेषनगाला प्राप्त झाले आहे.
व्यर्थ कुणाला न दुखवण्याचा संदेश शेषनाग देतो. मात्र, कोणी आपला घात करण्याचा प्रयत्न केला तर प्रतिकार करण्याचा सल्लाही शेषनाग देतो. शेषनाग केवळ अस्तित्वाचा अाभासानेच मनात भय निर्माण करतो. सत्याचे, सदाचाराचे सानिध्य म्हणजे सत्व. अशा सत्वशील शेषनागावर विराजमान होऊन श्रीरामचंद्र सायंकाळी ७ वाजता रामपेठेतील श्रीराम मंदिर संस्थानातून निघणार आहेत.
असा आहे वहन दिंडी मार्ग
सायंकाळी ७ वाजता गादीपती मंगेश महाराज यांच्याहस्ते श्रीराम मंदिर संस्थानात वहन पूजनासह आरती होईल. त्यानंतर वहन श्रीराम मंदिरातून निघून रथ चौक, श्री हिंगलाज माता मंदिर, मारुती पेठ, पांजरपोळ चौक, अण्णा भाऊ साठे चौक, कंवरराम चौक, पोस्ट ऑफिस, स्वातंत्र्य चौक, रिमांड होम, एम.जे. कॉलेज चौक मार्गे विठ्ठल मंदिराजवळ विनोद पाटील यांच्याकडे वहन आरती व पानसुपारी कार्यक्रम होईल.