जिल्ह्यात १६२ ग्रामपंचायतींच्या २२९ जागांसाठी पोटनिवडणूक
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपारिक पध्दतीने राबण्याचा निवडणुक कार्यक्रम बुधवारी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींमधील २२९ रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी बुधवारी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांचा मागास प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेल्या रिक्त जागा म्हणून अधिसूचित करण्यापूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतीम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करता येणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी तहसीलदार पोटनिवडणुकीची नोटीस प्रसिध्द करतील. नामनिर्देशनपत्रे मागवण्याची व सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत राहणार आहे. ७ डिसेंबर रोजी छाननी करण्यात येईल.
उमेदवारांना ९ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह देण्यात येईल. २१ डिसेंबर ही मतदानाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदारांनी निश्चित केलेल्या ठिकाणी मतमोजणी होईल. पोटनिवडणूक प्रक्रियेसाठी तयारी पूर्ण केली जात आहे.
पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रापं कंसात रिक्त पद संख्या
यावल ११(२५), रावेर १२ (१५), जळगाव ७ (८), मुक्ताईनगर १३ (१७), भुसावळ ८ (९), अमळनेर १३ (१५), धरणगाव ९ (९), पाचोरा १२ (१९), पारोळा १० (११), बोदवड ३ (३), चाळीसगाव १९ (२७), चोपडा १२ (२२), जामनेर १४ (२६), भडगाव १० (१०) व एरंडोल ९ (१३).