जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । राज्यवासियांची पहाट एका बातमीने सुन्न झाली. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास चिंतामणी ट्रॅव्हल्स या खासगी बसचा यवतमाळहून मुंबईकडे जात असताना नाशिक येथील नांदूर नाक्याजवळील मिरची हॉटेल येथे अपघात झाला. बसचा कंटेनरशी झालेला अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर बसने लगेच पेट घेतला. बसमधील प्रवाशी झोपलेले असल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही आणि त्यामुळे १० ते १२ जणांचा मृत्यू झाला. जखमींंना बाहेर काढण्यात आले असून जखमी झालेल्या ३४ जणांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात घडला आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडे निघाली होती. मात्र, नाशिकच्या औरंगाबादरोडवरील मिरची हॉटेल जवळ आयशर ट्रक आणि बसमध्ये जोरात धडक झाली. अपघातानंतर बसला भीषण आग लागली. पाहता पाहता ही आग पसरत गेली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.
अपघातावेळी बसमध्ये एकूण ५० प्रवासी असल्याचे समजते. त्यातील १२ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इतर ३४ वर प्रवाशी जखमी आहेत. जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे उपचारांसाठी हलवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांनी दिली आहे.
मृतदेह नेण्यासाठीही रुग्णवाहिका नव्हत्या, अशीही माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यामुळे सिटी बसमधून या अपघातामध्ये जिवंत जळालेल्यांचे मृतदेह नेण्याची वेळ ओढावली, असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. ही घटना खूप दुर्दैवी आहे, या घटनेचा तपास होईल” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जखमींना शासनातर्फे मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. तर मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.