शेअर मार्केटमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष; अमळनेरातील बीएसएफ जवानाला लाखोंचा गंडा

मार्च 6, 2026 11:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ऑनलाईन ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विविध आमिष दाखवून नागरिकांना गंडविले जात आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील एका बीएसएफ जवानाची यूट्यूब रिल्सच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत तब्बल २४ लाख ८२ हजाराची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात ४ मार्च रोजी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

fraud jpg webp

अमळनेर तालुक्यातील वावडे येथील रहिवाशी देवीदास बारीकराव पाटील (वय ४४) हे सीमा सुरक्षा दलात पश्चिम बंगाल येथे कार्यरत आहेत. २२ सप्टेंबर २०२५ रोजी ते यूट्यूबवर रिल्स पाहत असताना २२ हजार रुपये गुंतवल्यास पैसे दुप्पट होण्याचे आमिष दाखवणारी एक लिंक त्यांना दिसली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने फोन करून स्वतःला डेहराडून येथून बोलत असल्याचे सांगितले आणि मॉरिशसस्थित ‘ट्रेडग्रीप’ नावाच्या शेअर मार्केट कंपनीशी संबंधित असल्याचे भासवले.

भामट्यांनी पाटील यांना ‘ट्रेडग्रीप क्लायंट’ नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. सुरुवातीला २० हजार ९९९ रुपयांच्या गुंतवणुकीवर १ हजार ३३१ रुपयांचा नफा दाखवत त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर अधिक नफ्याचे आमिष दाखवत २२ सप्टेंबर २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये एकूण २४ लाख ८२ हजार २५६ रुपये भरायला लावले.

दरम्यान, पाटील यांनी गुंतवलेली रक्कम आणि नफा परत मागितल्यानंतर आरोपींनी आणखी ५ लाख रुपये भरण्याची मागणी केली. पैसे न भरल्यास पोर्टफोलिओ स्क्रॅप होईल आणि कंपनीचे नुकसान केल्याचा आरोप करत केस करण्याची धमकीही दिली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now