जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । जळगाव शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे शोरूम उभारत घाऊक आणि किरकोळ व्यावसायिकांकडून माल उधार घेण्यास सुरुवात केली. पैसे परत देण्याचा वायदा करीत पैसे न दिल्याचा प्रकार दोन भावांनी केला होता. गेल्या काही दिवसापासून व्यावसायिकांनी वारंवार मागणी करून देखील पैसे परत न केल्याने अखेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या फसवणुकीचा आकडा ६० लाखांच्या वर येत असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जळगाव शहरातील नाथ प्लाझा येथे श्री इलेक्ट्रॉनिक्स नावाने निलेश शांताराम पाटील व दिनेश शांताराम पाटील यांच्या मालकीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दुकान होते. ३१ जुलै २०१३ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान निलेश आणि दिनेश यांनी विविध घाऊक व्यावसायिकांकडून फ्रिज, एलईडी, वाशींग मशीन, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वस्तू असे साहित्य खरेदी केले होते. काही वेळी व्यवहार रोखीने तर काही वेळी ते उधारीने व्यवसाय करीत होते. घाऊक व्यावसायिकांशी संबंध जोपासल्यानंतर दोघांनी उधारी वाढविण्यास सुरुवात केली.
गेल्या वर्षभरापासून घाऊक व्यावसायिक निलेश आणि दिनेश यांच्याकडे पैशांची मागणी केली असता यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच शोरूम देखील बंद केले. व्यावसायिकांनी घरी जाऊन त्यांचा शोध घेत पैशांची मागणी केली असता तरीही त्यांनी दाद दिली नाही. अखेर काही व्यावसायिकांनी एकत्र येत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेंद्र सतीशचंद्र ललवाणी यांनी निलेश शांताराम पाटील व दिनेश शांताराम पाटील यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार निलेश पाटील व दिनेश पाटील यांनी महेंद्र ललवाणी, समर एजन्सी ११ लाख ८६ हजार ७३ रुपये, कैलास छाबरा, कैलास डिस्ट्रिब्युटर्स १२ लाख ७२ हजार ६८८ रुपये, निलेश रवींद्र वालेचा, शिव एजन्सीज १९ हजार ६१५ रुपये, प्रकाश मोहनलाल कृपलानी, कैलास टीव्ही भुसावळ २ लाख ८६ हजार ३५४ रुपये, अनिल प्रकाश कृपलानी, महादेव टीव्ही सेंटर भुसावळ ८ लाख ३२ हजार ९५२ रुपये, सुरेश दर्शनलाल वालेचा, शिव सेल्स ४ लाख ९९ हजार ३७२ रुपये, अभिजित जमादार, केव्ही इंटरप्रायझेस धुळे ९२ हजार १६० रुपये, देविदास हरिभाई वेद, आदीदेव इंटरप्रायजेस १ लाख ५५ हजार ३०० रुपये, राजेश उत्तमचंद बाग, बहार होम अप्लायन्सेस पुणे १४ लाख १० हजार १९९ रुपये, कैलास वरदमल छाबरा, कैलास डिस्ट्रिब्युटर्स २ लाख ६७ हजार ९३० रुपये अशी एकूण ६० लाख २२ हजार ६४३ रुपयांची फसवणूक केली आहे.