⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

Breaking : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाला, पण..

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना जामीन मंजूर केला आहे. मनी लॉडरिंग प्रकरणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 11 महिने 2 दिवसांच्या कोठडीनंतर अखेर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 2 नोव्हेंबर 2021 ला देशमुख यांना ईडीने अटक केली होती. आता आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांना ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. पीएमएलए न्यायालयानं 18 मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हानं दिलं आहे. प्रकृता अस्वस्थाचं कारण तसेच वाढतं वय पाहता आपल्याला जामीन देण्याची विनंती देशमुखांकडनं करण्यात आली आहे. अनिल देशमुख हे 73 वर्षांचे असून त्यांचा खांदा निखळलेला आहे, त्याचसोबत उच्च रक्तदाब आणि विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. याशिवाय त्यांना कोविड 19 ही होऊन गेलाय, या आजारांमुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्यानं त्यांना सतत आधार आणि दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून रहावं लागतंय. त्यामुळे मनवतेच्या भावनेनं जामिनावर सोडण्याची विनंती देशमुखांनी हायकोर्टाकडे केली आहे.

जामीन मिळाला पण.. 
अनिल देशमुख यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये हा जामीन मिळाला असून अजून सीबीआयकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आता सीबीआयकडूनही त्यांना जामीन मिळणार का हे पाहावं लागेल. त्यामुळे अनिल देशमुख यांची लगेचच तुरुंगातून सुटका होणार नाही हे स्पष्ट आहे. त्यांना सध्यातरी आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागेल. दरम्यान, अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या नागपुरातील घरी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्यमेव जयते असं म्हणत या निर्णयाचे स्वागत केलं आहे. आम्हच्या इतर नेत्यांसाठी लढत राहू असंही त्या म्हणाल्या.