⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे दोन्हीही गट सज्ज

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच काय होणार ? हा प्रश्न सगळ्यानांच पडला असतांना आता मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आपआपला दसरा मेळावा जोरदार व्हावा यासाठी तयारी करत आहेत. शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच दसरा मेळावा होणार असल्याने ठाकरे गटाने मेळाव्याची जय्यत करून शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही दसरा मेळावा घेऊन आपली ताकद दाखवण्याची तयारी केली आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने साडेचार हजार बसेस बुक केल्या आहेत असे सांगण्यात येत आहे. दोन्ही मैदानांची क्षमता एक लाख लोकांची आहे. बीकेसी येथील मैदानावर मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या सर्व आमदारांवर शिंदेंकडून मेळाव्याला गर्दी जमवण्याची जबाबदारी दिली आहे.यामुळे राज्यभरातून शिंदे गटाने ४५०० बसेस बुक केल्याची माहिती आहे. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून पाच लाख लोकांना बीकेसी मैदानावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दुसरीकडे शिवसेनेनेही दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. गटप्रमुखांच्या मेळाव्यात ठाकरे यांनी मोठया संख्येने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर ऐतिहासिक गर्दी पाहायला मिळणार आहे.असे म्हटले जात आहे. मेळाव्यांमुळे मुंबईची तुंबई होणार दोन्ही गटांच्या मेळाव्यांमुळे मुंबईसह उपनगरांत मोठी गर्दी होणार असल्याने पोलिस यंत्रणेवरही मोठा ताण पडणार आहे. पोलिस प्रशासनाकडून नियोजन बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. गर्दी तसेच वाहतुकीवर नियंत्रणासाठी पोलिस प्रशासनाला एसआरपीएफ, सीआरपीएफ आणि गृहदलाची मदत घ्यावी लागणार आहे. शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान परिसरात प्रत्येकी दहा हजार वाहने पार्किंगची सुविधा आहे. पण त्याहीपेक्षा जास्त वाहने येण्याची शक्यता पाहता उपनगरांतील मैदानांवर पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे.