⁠ 
सोमवार, मे 20, 2024

अठरा विश्व दारिद्रय, आईवडिल करतात मजुरी; चाळीसगावची भावंड केंद्रिय राखीव पोलिस दलात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २५ ऑगस्ट २०२३। परिस्थिती हलाखीची असली तरी तिला न जुमानता स्वप्न पूर्ण करता येतात. अशीच धमक होती वरखेडेच्या दोन भावंडांमध्ये! घरात अठरा विश्व दारिद्रय, पाचवीला कायमच पुजलेला संघर्ष अशा स्थितीत आई-वडिलांच्या कष्टाची जण ठेवत त्याचे चीज केले वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील दोघा सख्ख्या भावंडांनी. यशाला गवसणी घालत केंद्रिय राखीव पोलिस दलात दोघांनीही आपल्या यशाचा झेंडा फडकावला आहे.

वरखेडे येथील नाना तिरमली यांची घरची परिस्थिती जेमतेम आहे. फक्त दिड बिघा जमीन असून पत्नी आणि दोन मुले, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. संसार चालविण्यासाठी शेतीकाम व मजुरीशिवाय पर्याय नाही. दोघा मुलांपैकी संदीपने (वय २३) बीए पूर्ण करून मेकॅनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले तर आकाश (वय २१) बीएच्या दुसऱ्या वर्षाला आहे.

आई-वडिलांचे कष्ट आणि राबणारे हात पाहून दोघा भावंडांनी स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी दोघा भावांनी स्टॉफ सिलेक्शनमार्फत निघालेल्या सीआरपीएफ दलाच्या भरतीसाठी अर्ज भरला. गेल्या फेब्रुवारीत लेखी परिक्षा झाली. त्यात दोघेही उत्तीर्ण झाले. पुढचा टप्पा मैदानी परीक्षांचा होता. त्यातही त्यांनी बाजी मारली.तर जून, जुलैमध्ये पुण्यात वैद्यकीय चाचणी झाली. या परीक्षेचा निकाल गेल्या रविवारी जाहीर झाला आणि त्यात संदीप आणि आकाश यांची सीआरपीएफ पोलिस दलात नियुक्ती झाल्याचा निकाल लागला.

दोघे सख्ख्या भावांची केंद्रिय राखीव पोलिस दलात नियुक्ती झाल्याचे वरखेडेसह परिसरातील हे पहिलेच भावंडे ठरले आहेत. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या भावंडांनी हे यश मिळवले आहे. त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी जिद्द आणि चिकाटी व मेहनतीच्या जोरावर परीक्षांना तोंड दिले तर यश नक्कीच मिळते, हे वरखेड्याच्या दोघा भावंडांनी दाखवून दिले. त्यासाठी त्यांना मेहुणबारे येथील स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन करणारे सह्याद्री फाउंडेशनचे संचालक अमोल जाधव आणि मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस सतीष गवारे यांचे योगदान लाभले.