जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । शिक्षण क्षेत्रात खळबळ माजविणा-या सावदा येथील बहुचर्चीत इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू स्कूलमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आता नवीन ट्विस्ट समोर आला असून यात नव्याने तत्कालीन उपक्षिणाधिकाऱ्यांसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत बोगस शिक्षक भरती करण्यात आल्या प्रकरणी संस्था चालकांसह तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शे. सुपडू शे. रशीद मंसुरी, शे. हनीफ शे.रशीद मंसुरी, सगिर दगडू बागवान, मुक्तार अली कादरअली, लुकमान खान गुलशेर खान, शे. रफिक शे.गुलाब, दानिश सगिर बागवान, शेख सलीम अहमद शे. सुपडू पिंजारी, शे.सुपडू शे. जब्बार सलीम कुरेशी, तत्कालीन शिक्षण अधिकारी माध्यमिक भास्कर जे. पाटील, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी देवांग (पूर्ण नाव माहीत नाही); सगीर दगडू बागवान (मयत), मुख्तारअली कादरअली व लुकमान खान गुलशेर खान आदींचा संशयितांमध्ये समावेश होता.
या प्रकरणात आजवर फक्त शेख हनीफ शेख रशीद मन्सुरी यांना मे महिन्यात अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर याच प्रकरणात ५ ऑगस्ट २०२२ रोजी सावदा पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात अनेक बड्या मंडळीचा समावेश असून त्यांना अद्याप अटक करण्यात न आल्याने एकच चर्चा रंगली आहे.
याच प्रकरणात आता नव्याने तत्कालीन उपशिक्षणाधिकारी आणि सध्या चंद्रपूर येथील शिक्षणाधिकारी कल्पना दमडू चव्हाण, जिल्हा परिषदेतील कक्षाधिकारी किशोर विलास वानखेडे, चिंचोली येथील योगेश अशोक खोडपे आणि भुसावळातील शिक्षक शेख इक्बाल शेख कादर या चार जणांच्या विरोधात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आधीच एक शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी गोत्यात आले असतांना तेव्हा उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांसह कक्ष अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. तर आता या नव्याने गुन्हा दाखल झालेल्या व मागील बड्या मंडळींना अटक होते ? का त्यांना थेट न्यायालया कडून जामीना साठी अर्ज करून जामीन मिळतो ह्या कडे देखील शिक्षण क्षेत्रातील लोक व जनतेचे लक्ष लागून आहे