जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक शिवारात एका विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आलाय. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथे डॉ. विशाल पाटील यांच्या शेतातील विहिरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगताना दिसून आला. शेतात काम करत असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

विहिरीतून मृतदेह बाहेर आढळण्यात आला असून तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो काही दिवसांपूर्वीच विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पंचनामा करताना मृताजवळून नाशिकरोड ते मुजफ्फरपूर या मार्गाचे ११ मार्च रोजी नाशिकरोड येथून काढलेले रेल्वे तिकीट आढळून आले आहे. या तिकिटाच्या आधारे पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत व्यक्तीची ओळख पटविणे आणि मृत्यूमागील नेमके कारण शोधणे यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.










