जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । जळगाव तालुक्यातील कानळदा लसीकरण केंद्रातील दोघा परिचारिकांनी कोविड लस लंपास करत थेट रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनातील परिचितांना टोचून दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबतची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हिडीओत परिचारिका नकार देत असल्या तरी एक अधिकारी प्रकाराला दुजोरा देत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी लसींची कमतरता आहे. लोक लसीसाठी दिवसभर ताटकळत उभे असतात. जळगाव तालुक्यातील कानळदा येथे दोघा परिचारीकांनी आज दुपारी लसी थेट रस्त्यावरील चारचाकी वाहनातील परिचितांना टोचून दिल्या. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दोघा परिचारिकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे दोघी नर्स गोंधळल्या. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. एकीने तर मोबाईलला चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. केंद्रातून दोन व्हायल्स गायब झाल्याच्या प्रकाराला एक अधिकारी दुजोरा देत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडियात व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असून या प्रकाराची चर्चा सुरु आहे.
एका अधिकाऱ्याने लसीच्या व्हायल्स गायब असल्याचे मान्य केले असले तरी परिचारिका मात्र नंतर ते मान्य करीत नसल्याचे सांगत आहे. जर लस खरोखर गायब झाल्या असतील तर त्याचा ताळमेळ साधण्यासाठी इतरांना कमी लस दिली असावी किंवा लस ऐवजी पाणी टोचून दिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासन या प्रकारात किती लक्ष घालते हे पाहणे गरजेचे आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/479917073288669/