⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024

मुक्ताईनगर येथील कोविड सेंटरला आठ ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध

0
muktainagar

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । संत मुक्ताई शुगर एन्ड एनर्जी मुक्ताईनगर आणि कै ग सु वराडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थांच्या माध्यमातून रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आज उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथील कोविड केअर सेंटरला कोविड संक्रमण काळासाठी आठ ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले.

यावेळी उपस्थित रोहिणी ताई खडसे खेवलकर(उपाध्यक्षा संत मुक्ताई शुगर एन्ड एनर्जी मुक्ताईनगर ,अध्यक्षा कै ग सु वराडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था) डॉ योगेशजी राणे (वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय) निवृत्तीभाऊ पाटील बाजार समिती सभापती, राजुभाऊ माळी माजी प स सभापती,प्रविणभाऊ पाटील माजी सरपंच,प्रदिप भाऊ साळुंखे, बापु भाऊ ससाणे, आसिफ भाई बागवान,कल्याण भाऊ पाटील राजुभाऊ कापसे,संजयभाऊ कोळी, शिवराज भाऊ पाटील, संजय भाऊ चौधरी(पोलीस पाटील कोथळी) ,चेतनभाऊ राजपुत,योगेश भाऊ पाटील उपस्थित होते

नूरुद्दीन मुल्लाजी ‘मदर टेरेसा नॅशनल सेवा रत्न अवार्ड’ ने सन्मानित

0
kasoda
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार ए पी जे कलाम राष्ट्रीय उभारणी पुरस्कार प्राप्त नुरुद्दीन मुल्लाजी यांना मदर डेचे औचित्य साधून वल्लारी फाउंडेशन बेंगलोर यांच्या वतीने मदर टेरेसा नॅशनल सेवा रत्न 2021 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही त्यांना बरेचसे पुरस्कार मिळालेले आहे त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवर राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 14 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

0
vaccination on corona is effective

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । जळगाव  जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असतानाच नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 17 हजार 327 नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 96 हजार 616 नागरीकांना दुसरा डोस असे एकूण 4 लाख 13 हजार 943 लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर असून 1 मे ते 11 मेपर्यंत जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे येत आहे.

कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे शासनकडे मोठ्या प्रमाणात लसीची मागणी नोंदविली आहे. नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात 167 लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 17 हजार 327 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 96 हजार 616 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पैकी सर्वाधिक 1 लाख 12 हजार 948 नागरीकांचे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे तर 39 हजार 896 नागरीकांचे लसीकरण प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुविधा असलेल्या खाजगी रुग्णालयामार्फत करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  जमादार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

खाजगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांचे दर निश्चित ; तपासा नवे दर

0
ambulace

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जळगावच्या कार्यक्षेत्रात खाजगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर वाहनाचा प्रकार, सरासरी धाव, चालकाचा भत्ता, घसारा व ग्राहक निर्देशांक विचारात घेऊन निश्चित करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली आहे.

मारुती व्हॅन, मारुती इको (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत एक हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत पंधराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी दहा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

टाटा सुमो व जीपसदृश बांधणी केलेली वाहने (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सहाशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत बाराशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत अठराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी बारा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

टाटा 407/ स्वराज माझदाच्या प्रकारच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सातशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत चौदाशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत एकवीसशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी पंधरा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

आयसीयु (कार्डीओ व्हॅन) (वातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत दोन हजार रुपये, वीस किलोमीटरपर्यंत तीन हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत चार हजार रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी वीस रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

हे संपूर्ण भाडेदर अंतरानुसार लागू राहतील. या भाड्यापेक्षा कमी अथवा मोफत सेवा देता येवू शकेल, परंतु निश्चित केलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारणी करता येणार नाही. या भाडे दरपत्रकात चालकाचा पगार व इंधनाचा खर्च समाविष्ठ राहील. वाहन तांत्रिकदृष्टया सक्षम व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी चालकाची व मालकाची राहील. वाहनाच्या तांत्रिक दोषाकरीता वाहनचालक व मालक जबाबदार राहतील.

नमूद भाडे दरपत्रकापेक्षा जादा भाडे आकारणी होत असेल तर सबंधित रुग्णवाहिका वाहनधारकाची तक्रार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांचे दूरध्वनी क्रमांक 0257/2261819 व [email protected] या मेलवर करावी. असेही श्री. लोही यांनी कळविले आहे.

गाळे लिलाव आणि वॉटरग्रेस लवाद दोन्ही विवादित विषयांना मंजुरी

0
jalgaon manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । जळगाव शहर मनपात सत्तांतर झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच महासभेत शहरातील मनपा मालकीच्या १६ व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव करण्याचा आणि वॉटरग्रेस प्रकरणात लवाद नेमण्याचे दोन्ही विषय बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले. भाजपच्या काही सदस्यांनी दोन्ही विषयांना कडाडून विरोध केला. दरम्यान, सभा ऑनलाईन असतानाही भाजप सदस्य थेट सभागृहात येऊन पोहोचले.

महासभेला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतिष कुळकर्णी यांच्यासह सर्व नगरसेवक ऑनलाईन उपस्थित होते.

मनपा महासभेत आज शहरातील सर्व म्हणजे १६ व्यापारी संकुलांमधील गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबतचा महापालिका प्रशासनाने मांडलेला प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या आजच्या महासभेत आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोनाची परिस्थिती, गेल्या वर्षभरात त्यामुळे पायाभूत सुविधांसाठी उद्भवलेल्या व अचानक कराव्या लागणाऱ्या खर्चाचा अनुभव लक्षात घेवून पुढच्या वर्षातही दक्षाता घ्यावी लागेल. या मुद्द्यावर अर्थसंकल्पाची रचना करतांना प्रशासनाने भर दिला होता. हे वास्तव लक्षात घेवून आगामी काळात विविध करांच्या वसुलीवर आणि उत्पन्नावर जोर दिल्याशिवाय उपाय नाही. अशी भूमिका प्रशासनाने आज महासभेत मांडली होती.

गाळ्यांचा लिलाव होणार?

गाळ्यांच्या भाड्यातून १६० कोटी उत्पन्न अपेक्षीत असल्याची भूमीका प्रशासनाने घेतली आहे. त्याचप्रमाणे खुला भूखंड दर जास्तीत जास्त वसूल करण्याचे धोरण पुढच्या वर्षभरात राबविले जाणार आहे. ज्या व्यापाऱ्यांनी गाळ्यांचा भाडे भरणा केलेला आहे त्यांना पुढील १० वर्षासाठी ते दुकान कराराने दिले जाणार आहे तर उर्वरित गाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे.

महापौरांच्या सभागृहात गोंधळ

महासभेत गाळ्यांचा विषय बहुमताने मंजूर झाल्यानंतर भाजपचे गटनेते भगत बालाणी, सदस्य कैलास सोनवणे, ऍड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, धीरज सोनवणे यांनी ऑनलाईन पद्धतीने विरोध नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळात हा विषय मंजूर झाला. त्यानंतर लवाद नेमण्याचा विषय नगरसचिव सुनील गोराणे यांनी वाचायला घेतला. हा विषय देखील बहुमताने मंजूर होत असल्याने भाजपचे सदस्य आक्रमक झाले. त्यानंतर भाजपचे सदस्य कैलास सोनवणे, भगत बालाणी, धीरज सोनवणे आदी थेट सभागृहात दाखल झाले. त्यांनी हे दोन्ही विषय मंजूर केल्याबाबत आक्षेप घेतला. शिवसेनेने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली.

त्यावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वाद झाला. हा गोंधळ वाढत गेल्याने शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सदस्य प्रशांत नाईक, विष्णू भंगाळे, गटनेते अनंत जोशी, नितीन बरडे हे देखील सभागृहात दाखल झाले. त्यामुळे गोंधळ वाढला. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी ही महासभा ऑनलाईन असल्याने सदस्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा वाद मिटला. नंतर सभा पूर्ववत सुरू होऊन, पुढील विषयांवर चर्चा सुरू झाली.

सावदा येथे लसीकरणावरुन राजकरण; रोहिणी खडसेंनी राजकारण न करता समाजसेवा करावी, शिवसेनेचा पलटवार

0
rohini khadse vaccined at sawda

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । सावदा  येथे लसीकरण केंद्रावरील उडालेल्या गोंधळानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी भेट दिल्याने याला राजकीय वळण लागले. रोहिणीताईंनी फ्रंटलाईन वर्करसाठी असणार्‍या २० लस देखील सर्वसामान्य नागरिकांना देण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी गोंधळ निस्तरण्यासाठी वाढीव लसींची मागणी केली.

याला शिवसेनेतर्फे शहरप्रमुख भरत नेहते व सूरज परदेशी यांनी आपल्या सहकारी पदाधिकार्‍यांसह पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. यात ते म्हणाले की, सावदा शहरासाठी आज मिळालेल्या लसी या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मिळाल्या आहेत. रोहिणीताईंनी येथे येऊन राजकारण केले. त्यांनी केवळ श्रेया साठी राजकरण न करता खरी खुरी समाजसेवा करावी असा खोचक सल्लादेखील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी दिला.

रावेर न्यायालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या; एकाच वर्षात कुटुंबातील चार जणांचे निधन

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । रावेर न्यायालयातील कर्मचाऱ्याने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. हितेंद्र हेमकांत कुलकर्णी (रा.खोटेनगर,जळगाव) असे आत्महत्या केलेल्या कर्मचार्याचे नाव असून या बाबात लोहमार्ग पोलिसातअकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हितेंद्र कुलकर्णी हे जळगाव शहरातील खोटेनगर मध्ये आपल्या आई, पत्नी व दोन मुलींसह वास्तव्यास आहे. ते रावेर न्यायालयात नोकरीस असून त्यांनी काल मंगळवारी दुपारी ४ वाजता सुमारास खोटेनगरजवळील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. दरम्यान घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यात त्यांना हितेंद्र यांचे ओळखपत्र आढळून आल्याने त्यांनी ओळख पटली. त्यानंतर पंचनामा करुन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

वर्षाभरात कुटुंबातील चार जणांचे निधन

हितेंद्र कुलकर्णी यांचे कुटुंब उच्चशिक्षित असून कुटुंबातील बहुतांश सदस्य हे शासकीय सेवेत आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी २६ जानेवारी रोजी हितेंद्र यांच्या लहान भावाचे निधन झाले. त्यानंतर १७ मे २०२० रोजी वडीलांचे देखील अकस्मात निधन झाले तर मार्च महिन्यात त्यांच्या काकाचे देखील निधन झाले. दरम्यान आता हितेंद्र यांनी आत्महत्या केल्याने एकाच वर्षात कुटुंबातील चार जणांचे निधन झाल्याने कुलकर्णी कुटुंबावर मोठा आघात कोसळला.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

0
corona (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । जळगाव  जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरीता जिल्हा प्रशासनाच्या कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या 10 लाख 8 हजार 288 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. पैकी आतापर्यंत (11 मे) 1 लाख 31 हजार 574 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपायायोजनांमुळे कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर हा 13 टक्क्यांपर्यत खाली आला असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ट्रीपल टी’ (ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट) वर भर दिला असून यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदेच्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य यंत्रणेमार्फत माझे कुटूंब, माझी जबाबदारी, संशयित रुग्ण शोध मोहिम प्रभावीपणे राबवून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील हायरिस्क व लोरिस्क व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना सदृश्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींचीही चाचणी करण्यात येत आहे. जेणेकरुन बाधित रुग्णांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण लवकर बरा होतो.

संशयितांची तपासणी लवकर होऊन त्यांचा अहवाल त्वरीत प्राप्त व्हावा, याकरीता जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजेन टेस्टचे ग्रामीण व शहरी भागात शिबिर आयोजित करण्यात येत असून बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती व संशयितांचे स्वॅब तपासण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे. संशयितांचे अहवाल वेळेत मिळण्यासाठी आवश्यकतेनुसार खाजगी प्रयोगशाळांकडेही अहवाल तपासण्यासाठी पाठविले जातात.

कोरोनाचा साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात दैनंदिन 7 हजारापेक्षा अधिक कोरोना संशयितांची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या 10 लाख 8 हजार 288 व्यक्तींच्या कोरोना तपासणीपैकी 7 लाख 7 हजार 92 व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली असून यापैकी 77 हजार 114 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर 3 लाख 1 हजार 196 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून पैकी 54 हजार 460 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच 1 हजार 772 ईतर अहवाल आढळले असून सध्या 1471 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-19 चे नोडल अधिकारी डॉ एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकात दिली आहे.

त्वरीत निदान, त्वरीत उपचार या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तींस कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी त्वरीत नजिकच्या रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

भाववाढीच्या अफवेने जळगावात दिवसभरात पेट्रोल पंप रिकामा

0
petrol diesel

 जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । लॉकडाऊनच्या संकटामुळे सामान्य लोकांना आर्थिक चणचण जाणवत असतानाच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार आणि पुढील काही दिवस पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशी अफवा पसरल्याने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील एक पंप नागरिकांनी दिवसभरात रिकामा केला.

राज्यातील अनेक शहरांमध्ये बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा काही पैशांची वाढ नोंदवण्यात आली. आज मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 98.36 तर डिझेलचा दर प्रतिलीटर 89.75 इतका आहे.

पेट्रोल आणि डिझेलचा हा वरच्या दिशेचा प्रवास आणखी काही काळ सुरु राहू शकतो. परिणामी अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

मुंबई: पेट्रोल- 98.36 , डिझेल 89.75

पुणे: पेट्रोल- 98.06, डिझेल 88.08

नवी मुंबई- 98.56, डिझेल 89.94

नाशिक: पेट्रोल- 98.76, डिझेल 88.76

औरंगाबाद: पेट्रोल- 99.60, डिझेल 90.99

जळगावात अफवेमुळे एका दिवसात पेट्रोल पंप रिकामा

जळगावच्या मुक्ताईनगर परिसरात मंगळवारी एका अफवेमुळे लोकांनी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी केली होती. पुढील दहा दिवस पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, अशी अफवा या भागात पसरली होती. त्यामुळे कुऱ्हाड येथील दोन्ही पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. यापैकी एका पेट्रोल पंपातील इंधनाचा साठा पूर्णपणे संपला.

याविषयी, पेट्रोल पंपाच्या चालकाला विचारले असता त्याने ही अफवा फेटाळून लावली. पेट्रोल-डिझेल नियमित मिळणार आहे, असे त्यांनी लोकांना सांगितले. मात्र, तरीही लोकांनी लांबच लांब रांगा लावून पेट्रोल-डिझेल विकत घेतले.