⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : १५ मे २०२१

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यासाठी सलग दुसरा दिवस कोरोना संसर्गाच्या दृष्टीने दिलासा देणारा ठरला. आज शनिवार प्राप्त अहवालानुसार दिवसभरात ६१८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज ६७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात बाधित रुग्णांसह मृताचा आकडाही कमी होतानाचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासात ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती काही प्रमाणात सुधारत असल्याचे चित्र आहे. १४ एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम आता दुसऱ्या महिन्यात दिसू लागला आहे. आज शनिवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत नवे केवळ ६१८ रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख३४  हजार ५११ वर पोचली. तर ६७० रुग्ण दिवसभरात बरे झाले असून बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २२ हजार ४५२ वर पोचला आहे.तर आज ११ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २४०६ वर गेला आहे, जिल्ह्यात सध्या ९६५३ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

चाचण्याही घटल्या

शनिवारी रुग्णसंख्या घटल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात प्राप्त चाचण्यांच्या अहवालाचा आकडाही कमी होता. गेल्या २४ तासांत केवळ ४ हजार ८२४  चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. विशेष म्हणजे त्यात रॅपिड ॲन्टीजेन (४१२४) जास्त आणि आरटीपीसीआर (७००) चाचण्यांची संख्या कमी आहे.

आजची आकडेवारी 

जळगाव शहर ६६, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ ५७, अमळनेर ३९, चोपडा ८५, पाचोरा ०६, भडगाव ०४, धरणगाव ३५, यावल ३४, एरंडोल ४५, जामनेर ६०, रावेर ३२, पारोळा ००, मुक्ताईनगर ३२, बोदवड ३३, अन्य जिल्ह्यातील ०४.

यावल तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा, अन्यथा भाजप करणार आंदोलन

0
yawal

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । सध्याचे करोना काळातही पोलिसांचे दुर्लक्षामुळे तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंदे तात्काळ बंद न केल्याने तीव्र आंदोलनाचा ईशारा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.

कोरोनाचा थैमान सुरू असताना दुसरीकडे मात्र तालुक्यात सर्वाधिक अवैध धंद्याला ऊत आला असून पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष होत आहे या सर्व अवैध धंदे तात्काळ बंद न केल्यास भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असा ईशारा तालुका उमेश फेगडे यांनी दिला आपन यासंदर्भात लेखी तक्रार वरिष्टांपर्यत  करणार असल्याचे माहिती दिली आहे.

उमेश फेगडे  यांनी सांगितले की, यावल शहरात व तालुक्यातील सर्वच जुगारीचे अडे अवैध व बनावट दारु सर्रास विक्री होत असून बनावट दारू गांजा भांग विक्री आणि कोरोनाचा पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पायमल्ली करून जोमाने सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरू असून आसनव्यवस्था व प्रवासी क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणावर अधिक भाडे आकाारणि करून होणारी गरजु प्रवाशांची होणारी लूट व सोशल डिस्टेंसिगचे होणार फज्जा अशा प्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळ जात आहे. उघड उघड मिळणाऱ्या दारूमुळे तरूणाच्या जीवाची राखरांगोळी होत आहे. त्यांचा कुंटुबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना उपासमारीची प्रसंग ओढला जात आहे. मात्र पोलिस प्रशासनाने आर्थिक मोहापोटी सर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे कोरोनाच्या नावाखाली पोलिसांकडून सर्वसामान्यांना त्रास देवुन कायद्याचा बढगा जात आहे असे ही ते म्हणाले.

शेरी तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई, ग्रामपंचायत असक्षम

0
jamner

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । जामनेर तालुक्यातील मौजे शेरी येथील १५०० लोकसंख्येचे गाव आहे या गावात मागील १५ वर्षापासून शासनामार्फत साठवण तलाव बांधण्यात आला आहे त्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात किमान २ वर्ष पुरेल एवढे पाणी साचत असते आणि शेरी ग्रामपंचायतने काही वर्षापूर्वी  स्वखर्चाने साठवण तलावासाठी ज्या जमीनी अधिग्रहीत केल्या आहे.

त्यामध्ये किमान ६० फूट खोल विहीरीचा उन्हाळ्यात पाझर तलावातील ग्रांमपचायतच्या मालकीचा विहीर राणीसाठी कमी झाल्यास विहीर ऊघडी पडल्यावर नागरिकांना पिण्यासाठी पाणी कमी पडल्यास तीचा सुध्या वापर होतो म्हणून सदर विहीर करण्यात आली होती.परंतु आज परिस्थिती अशी आहे कि या पाझर तलावामधे २० ते ३० % पाणी साठा शिल्लक आहे,या पाझर तलावासाठी शेतकर्यांच्या जमिनी गेल्यानंतर या जमीनीमधील विहिरींना मुबलक पाणी आहे.विशेष म्हणजे या ३ ते ४ विहीरी आता शासन मालकीच्या आहेत.

सध्या शेरी गावाला पुढे अजून २ महिने पुरेल एवढे पाणी आहे आणि हे मोफत पाणी वापरायला असतानां देखील शेरी ग्रामपंचायतने पाझर तलावा शेजारी खाजगी जमीन मालक बाबुराव विठ्ठल पाटील यांचे शेतातील विहीर शेरी ग्रामपंचायत मधील सदस्यांनी या शेतकऱ्याला न विचारता त्याच्या विहिरीचा विहीर अधिग्रहणचा चुकीच्या पद्धतीने ठराव करून सदर शेतमालकाची विहीर गावातील नागरीकांना पाणी पुरविण्यासाठी अधिग्रहित केली आणि वर सांगितल्या प्रमाणे शेरी ग्रामपंचायतकडे मोफत पाणीसाठा असतांना या मालकाची विहीर अधिग्रहित करून शासनावार गरज नसतांना आर्थिक बोजा टाकून या विहिरी मधून पाणी उपसण्यासाठी प्रयत्न सुरूय आणि पाझर तलावामध्ये आणी त्यातील विहीरींनी मुबलक पाणी असतानां शेरी गावातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाई भासविण्याचा प्रकार शेरी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुरु आहे.

आणि गावातील नागरिकांनी मग शेरी ग्रामपंचायत पाणी पुरवत नसेल तर गावा मध्ये पाणी टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली गावकर्यांनी केली आहे आणी शेरी ग्रामपंचायतच्या पाणी नियोजना बाबत जामनेर तहसीलदार साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांना पुढील काळात नागरिकामार्फत पाणी टंचाई बाबत मोर्चा नेऊन निवेदन देण्यात सुद्या देण्यात येणार आहे.

भल्या पहाटे रंगत होता पत्त्याचा डाव ; पोलीस आले आणि…

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । भुसावळ शहरातील साई नगर साईबाबा मंदिराच्या मागे जामनेर रोड येथे सुरु असलेला जुगाराचा डाव पोलिसांनी कारवाई करीत उधळून लावला. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडील १५ हजार ५६० रोख रक्कम जप्त करत ६ जणांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत असे की, भुसावळ शहरातील साई नगर साईबाबा मंदिराच्या मागे जामनेर रोड येथे लाइटच्या उजेडात आज दि.१५ रोजी ३.१० वाजेला पहाटेच्या सुमारास सार्वजनिक जागी खाली बसून घोळका करून पत्ते खेळताना पोलिसांना आढळून आले. त्यात रतन पुरी गोसावी वय 26 राहणार महेश नगर, अमोल काशिनाथ राणे वय 23 राहणार श्रीराम नगर, गजानन एकनाथ पाटील वय 29 राहणार महेश नगर, प्रशांत उर्फ बबलू नाना सुरवाडे वय 23 राहणार कलानगर, निखिल श्रीकृष्ण पाटील वय 25 राहणार प्रेरणा नगर,  श्रीकृष्ण वासुदेव सकाळ वय 37 राहणार दीनदयाल नगर,  सर्व राहणार भुसावळातील असे ताब्यात घेतलेल्यांचे नाव आहे. त्यांच्या ताब्यातून १५ हजार ५६० रोख रक्कम मिळून आली म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून फिर्यादी पोकॉ ईश्वर संजय भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोहेकॉ सुनील जोशी,पोना उमाकांत पाटील,ईश्वर भालेराव, दिपक पाटील, होमगार्ड लीलाधर कपले अशांनी मिळून केली.

नगरदेवळा शिवारातील विहिरीत पडून सैनिकाचा मृत्यू ; परिसरात खळबळ

0
nagardewala (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । भडगाव तालुक्यातील पिंप्रीहाट येथील रहिवाशी व नासिक येथे सैन्यात पी. टी. प्रशिक्षक पदावर सेवेत असलेल्या २६ वर्षीय जवानाचा पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा शिवारातील विहरित आज शनिवारी दुपारी मृतदेह आढळून आला. प्रमोद दिनकर पाटील (वय – २६) असे या मृत जवानाचे नाव असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जवानाचा मृतदेह तब्बल ३३ तासांनंतर आढळून आला असून घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जवानाचा १६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील युवतीशी विवाह झाला होता. जवानाच्या मृत्यूमुळे पिंप्री हाट व तारखेडा या दोन गावांवर शोककळा पसरली आहे. अक्षय तृतीयाच्या आधल्या दिवशी भडगाव व जळगाव पोलिसांनी याच परिसरात जुगार अड्यावर छापा टाकून ३१ दुचाकींसह ८ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली होती. त्या घटनेचा जवानाच्या मृत्यूशी काही संबंध आहे की काय? याबाबत उलट सुलट चर्चा असून याबाबतचे खरे वृत्त पोलिसांच्या चौकशीनंतरच बाहेर येणार आहे.

प्रमोद पाटील हा २०१६ मध्ये सैन्यात भरती झाला होता. त्यानंतर नाशिक येथील पी. टी. सेंटरमध्ये प्रशिक्षक म्हणून गेल्या २ वर्षांपासून सेवा देत असतांना ४ मे रोजी त्याच्या चुलत भावाचा विवाह असल्याने तो ३ मे रोजी पिंप्री हाट येथे विवाहासाठी आला होता. यानंतर एक जूनला सुटी संपणार असल्याने प्रथमच पत्नीला नाशिक येथे सोबत घेऊन जाण्याचे स्वप्न त्याने रंगविले होते. मात्र दैवाला ते मान्य नसल्याने तो गुरुवारी सायंकाळी कोणास काही एक न सांगता घराबाहेर निघून आला.

दरम्यान नगरदेवळा शिवारातील छबुलाल भिका चौधरी हे शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या शेतातील विहरीजवळ गेले असता त्यांना एक पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगत्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी घटनेबाबतची माहिती नगरदेवळा ता. पाचोरा दुरक्षेत्राच्या पोलिसांना कळविली. दरम्यान प्रमोद पाटील हा घरी न असल्याने त्याच्या घरच्या मंडळी त्याचा शोध घेत फिरत होते. प्रमोद पाटील यांचा चुलत भाऊ समाधान संतोष पाटील हा घटनास्थळी पोचल्याने त्याने आपला चुलत भाऊ प्रमोदच असल्याचे ओळ्खल्यानंतर जोराने हंबरडा फोडला. घटनेबाबत समाधान पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. मयताचे पश्चात आई, वडील, पत्नी, १ भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे.

पाचोऱ्यात छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर

0
pachora (2)

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । पाचोऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भडगाव रोड वरील छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या नियोजित पुतळ्यास्थळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमापूजन व रक्तदान शिबिर पार पडले.

यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे ,डॉक्टर भूषण मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत पाटील,शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर यांचे सह संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी छत्रपतींना अभिवादन करत माल्यार्पण केले. याप्रसंगी आर्यन ग्रुपचे आर्यन मोरे व सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले  होते.

यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत आपल्या सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडले. कार्यक्रमस्थळी कोरोना नियमांचे पालन करण्यात   येऊन सामाजिक अंतर पाळत सर्वांनी कार्यक्रमात सहभाग दर्शवला.दरम्यान महाविकास आघाडीचे नेते आ. किशोर अप्पा पाटील व माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी काही काळ असपसात हितगुज केले. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी या बाबत उपस्थित कार्यकर्त्यांत कुजबुज सुरू होती.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंधांचे पालन करा, अन्यथा… जिल्हाधिकारी राऊतांचा इशारा

0
abhijit raut

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची प्रशासनातील सर्व घटक पूर्ण ताकदीने अंमलबजावणी करीत असूनही बाधित रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही, ही चिंतेची बाब आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करावे. अन्यथा प्रशासनास कठोर कारवाई शिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही. असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिला.

येथील पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा,

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भीमाशंकर जमादार, महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रशासन निर्बंधांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असूनही जिल्ह्यात काही नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडत असून परिणामी असे नागरिक स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही बाधित करतात. लसीकरणासाठी अनावश्यक गर्दी करणारे नागरिक, कोरोना बाधित रुग्णांसोबत दवाखान्यात गर्दी करणारे नातेवाईंक, अरुंद गल्ली बोळांत बेकायदेशीरपणे भाजीपाला विक्रेते थाटत असलेली दुकाने आणि त्यावर होणारी गर्दी, काही नागरिक 7 ते 11 वाजेदरम्यान किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्री दुकानांवर विनाकारण गर्दी करणारे नागरिक यांच्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यात अडथळे येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून 31 मे पर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभागाने उपलब्ध डोसनुसार आदल्या दिवशीच दुपारी 4 वाजेनंतर संबंधित लसीकरण केंद्रांवर कुपनचे वाटप करावे, म्हणजे दुस-या दिवशी अनावश्यक होणारी गर्दी टाळता येईल. शिवाय सर्वांना लस उपलब्ध होईल. कोरोना रुग्णांची आरोग्य विभागाकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे असा विश्वास त्यांच्या नातेवाईंकांना वाटावा यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईंकांमध्ये व्हीडीओ काॅलद्वारे संवाद साधून द्यावा जेणेकरून नातेवाईक रुग्णांना भेटण्यासाठी दवाखान्यात येण्याचा आग्रह धरणार नाहीत. यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.

विनाकारण फिरणा-यांवर कठोर कारवाई – डाॅ. मुंढे

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रशासनाने दिलेल्या वेळेनंतरही काही नागरीक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत असून पोलीस त्यांच्यावर योग्य ती कारावाईही करत आहेत. परंतु यापुढे अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर अधिकाधिक कडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस, गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. यापुढे नागरिकांनी अशाप्रकारे विनाकारण बाहेर फिरणे टाळावे. अन्यथा गुन्हे दाखल सारख्या कारवाईस सामोरे जावे लागेल. असा इशारा पोलीस अधीक्षक डाॅ. मुंढे यांनी दिला. आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नसल्याने नागरीकांनी त्यास महत्त्व देऊन आपल्यासह सर्वांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी नेमून दिलेल्या जागेवरच विक्री करावी – कुलकर्णी

महानगर पालिका आयुक्त सतीश कुलकर्णी म्हणाले की, कोरोनाला आळा घालण्यासाठी फळ आणि भाजी विक्रेत्यांनी महानगरपालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच बसून व्रिकी करावीत. अनधिकृत जागेवर तसेच सकाळी 7 ते 11 या नियोजित वेळेआधी किंवा नंतर आणि इतर कोठेही विक्री करतांना आढळल्यास त्यांचेवर अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल. असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील मोठ्या चौकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गरजू विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण अभियान

0
deepstamb

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । लॉकडाउनचा काळ हा सर्वांसाठीच अडचणीचा ठरला आहे. सगळ्याच क्षेत्रांमध्ये याचा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. परंतु शिक्षण क्षेत्रात झालेला बदल प्रत्येक विध्यार्थ्यांच्या आयुष्यात एक आमूलाग्र बदल घेऊन आला आहे .शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमा अंतर्गत ऑनलाइन शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वत्र वाहू लागली. परंतु लॉक डाऊन च्या काळात आर्थिक अडचणीमुळे मोबाईल व इतर सुविधांच्या अभावी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना बऱ्याच आव्हानाना सामोरे जावे लागत आहे.

काही विद्यार्थ्याच्या पालकांनी  गुरे विकून,कर्ज घेऊन तर आईने मंगळसूत्र मोडून मोबाईल घेतले आहे असे काही विद्यार्थ्यांनी दीपस्तंभ मिशन शिबिरात निःशुल्क प्रशिक्षणासाठीच्या अर्जात नमूद केले आहे.या वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे  शिक्षण अक्षय्य राहावे म्हणून अक्षय तृतीयेपासून  दीपस्तंभ फाउंडेशन तर्फे रतनलाल सी. बाफना ट्रस्ट जळगाव, हाय मिडिया लेब्रोटरी ठाणे व पुखराज पगारिया फाउंडेशन जळगाव यांच्या सहकार्यातून 10वी व 12 वीच्या गुणवंत व गरजू  विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण अभियान राबविण्यात येत आहे. अशी माहिती दीपस्तंभ फाउंडेशन चे उपाध्यक्ष डॉ राजेश डाबी यांनी दिली

या अभियानाअंतर्गत आर्थिक परिस्थिती अत्यंत अडचणी ची असलेले गुणवंत विद्यार्थी, दिव्यांग व अनाथ विद्यार्थी यांचे शिक्षण घेता यावे यासाठी  अँड्रॉइड मोबाईल,परिक्षा फॉर्म फीस/ट्यूशनस फीस् साठी आर्थिक सहाय्य, पुस्तके या बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

गरजू विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा त्यांच्या शिक्षकांनी अर्ज करताना स्वतः ची संपूर्ण माहिती,मिळवलेले यश / विशेष प्राविण्य,कौटुंबिक माहिती,आर्थिक परिस्थिती,कोणती मदत हवी आहे, शिफारस देणाऱ्या शिक्षकांचे नाव व संपर्क असे सविस्तरपणे अर्जात नमूद करून या 8380076545 क्रमांकावर व्हॉटसअप मेसेज करावा.

आलेल्या अर्जांपैकी पडताळणीनंतर गुणवत्तेच्या आधारे व आर्थिक परिस्थितीनुसार 200 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना संपर्क केला जाईल.कुठलाही घटक शिक्षणाच्या प्रवाहातून वंचित राहू नये हाच या उप्रकामा मागील उद्देश्य आहे. काळ बिकट असला तरी  शिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे.शिक्षणच व्यक्तीला नंतर कधीच हात पसरवण्याची वेळ येऊ देत नाही व ती व्यक्ती इतरांनाही उभारण्यासाठी सहकार्य करू शकते.नागरिकांनाही या योजनेत सहभागी व्हावे.ज्या व्यक्तींना/संस्थांना  या अभियानात आर्थिक योगदान व मोबाइल देऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करायचे असल्यास देणगीसाठी संस्थेशी संपर्क करावा असे आवाहन संस्थे मार्फत करण्यात आले आहे.

रासायनिक खतांच्या किमती कमी करण्यासाठी पाठपुरावा करावा ; रोहिणी खडसेंचं पत्र

0
rohini khadse

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । यंदाचा खरिप हंगाम जवळ आला असुन पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतु पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते यांच्यासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबींची जुडवणुक करण्यासाठी शेतकरी बांधव लागला आहे परंतु केंद्र शासनाने रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्या मुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे हि बाब शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारी आहे.

हि बाब लक्षात घेऊन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषिमंत्री शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहुन केंद्राकडे पाठपुरावा करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्या व येत्या खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे हि मागणी केली आहे.

पत्रात त्यांनी खरीप हंगाम जवळ आला असून शेतकरी बांधव पेरणीपूर्व शेतीमशागतीच्या कामाला लागले. आहेत. परंतु गेल्या वर्षापासून कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. गेल्या खरीप हंगामात पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनही उत्पादनात घट आल्याने आणि शेत मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.

यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी बियाणे आणि खते खरेदीसाठी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यातच रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली असल्या कारणाने शेतकऱ्यांचे या खरीप हंगामाचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडून जाण्याची शक्यता आहे. केमिकल व फर्टिलायझरचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे सर्व खत कंपन्यांच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे सांगितले होते. परंतु खत कंपन्यांनी अचानक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केल्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत.

तरी आपणकेंद्र सरकारकडे पाठपुरावा करून खतांची ही दरवाढ रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे तसेच खरीप हंगाम सुरु होण्यावर आला असून शेतकऱ्यांकडे योग्य प्रतीचे बियाणे उपलब्ध नसतात. शेतकरी दरवर्षी पेरणीच्या वेळी बाजारातून बियाणे खरेदी करतो. या बियाण्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच यातील काही बियाण्यांचा दर्जा निकृष्ठ असतो.

त्यांची उगवण क्षमता कमी असते. या निकृष्ठ दर्जाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागते. त्यामुळे शेतकरी बांधव अजून आर्थिक गर्तेत अडकतो. तरी आपण आपल्या स्तरावरून उचित कार्यवाहीकरून, उच्च प्रतीची उगवण क्षमता असणारे बियाणे योग्य किमतीत शेतकरी बांधवांना उपलब्ध करून द्यावे व खत व बियाण्यांच्या विक्रीत, किमतीत ,पुरवठ्यात काळा बाजार होऊ नये, यासाठी या लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथकाची नेमणूक करावी, अशी मागणी रोहिणी खडसे खेवलकर यांनी केली आहे.