⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे तीन फरार संशयीत जाळ्यात

0
jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१  शहरातील कुसुंबा येथील स्वामी समर्थ बैठक हॉल जवळ राहणाऱ्या अक्षय सोनवणे या तरुणाला मारहाण करीत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी फरार असलेल्या तिघांना आज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

कुसुंबा येथील अक्षय सोनवणे या तरुणाला दि.२८ फेब्रुवारी रोजी रोजी एका तरुणीवर प्रेम करतो या कारणावरून काही तरुणांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात फरार असलेल्या संतोष उर्फ बब्ब्या सुभाष कोळी, दिनेश उर्फ गोलू मधुकर पाटील आणि एका अल्पवयीन तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी कुसुंबा नाक्याजवळून अटक केली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मिलींद सोनवणे, हेमंत कळसकर, सुधीर सावळे, चंद्रकांत पाटील यांनी ही कामगिरी बजावली आहे.

किनगाव बु ॥ येथील बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला

0
kingaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । यावल तालुक्यातील किनगाव बु ॥ येथील कालपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. महेश पंढरीनाथ माळी (वय-४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

किनगाव बु. येथील महेश माळी हे शेती काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, काल रविवारी ते शेतात जावून येतो असे सांगून घराबाहेर पडले होते.  परंतु ते सायंकाळपर्यंत घरी परत आले नाही म्हणुन कुटुंबातील मंडळीने शेतात जावुन शोध घेतले असता शेतातील विहीरीच्या ठीकाणी मोटरसायकल व विहीरीजवळ बुट मिळुन आली. मात्र माळी हे दिसुन आले नसल्याने पुनश्च कुटुंबातील मंडळीने गावातील पट्टीचा विहीरीतून प्रेत शोधणाऱ्या कैलास कडु थाटे यास विहीरीत उतरून शोध घेण्याचा पुर्ण प्रयत्न केला असता तो मिळुन आला नाही. याप्रकरणी यावल पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, आज महेश माळी यांचे मोठे भाऊ किरण पंढरीनाथ माळी (वय ४५) यांनी यावल पोलीसात भाऊ महेश माळी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तर आज दुपारच्या सुमारास महेश माळी यांचा मृतदेह किनगाव शिवारातील त्यांनी केलेल्या शेतातील विहीरीत मिळून आला. दरम्यान, माळी यांनी आत्महत्या केली की ते विहीरीत पडले हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा तपास सहाय्यक फौजदार विजय पाच पोळे, पोलीस अमलदार सुनिल तायडे हे करीत आहे.

भुसावळात वेळेचं उल्लंघन करणाऱ्या ५ दुकानांवर सीलची कारवाई ; व्यापार्‍यांमध्ये खळबळ

0
jalgaon (2)

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज सोमवारपासून ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीला सकाळी ११ वाजेपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, भुसावळ शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने पाच दुकानांना  सील ठोकण्यात आल्याने व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणार्‍यांच्या दुचाकी जप्त केल्या जात आहेत.

सकाळी सात वाजेपासून पोलिस व पालिका कर्मचारी रस्त्यावर उतरताच नागरीकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. कारवाईचा इशारा दिल्यानंतरही सब कुछ चलता है म्हणणार्‍या पाच व्यापार्‍यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करताच व्यापार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी शहरातील मुख्य चार पॉईंटवर नाकाबंदी केली  असून  11 वाजेनंतर विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे  बाजारपेठ व रजा टॉवरजवळ नाकाबंदी करून आरपीटीपीसीआर टेस्ट केली जात असून  शहर हद्दीत दोन व बाजारपेठ हद्दीत पाच अशी सात पथके अनावश्यक दुकाने खुली ठेवणार्‍यांवर कारवाई करीत आहे. शहरातील मध्यवर्ती मार्केट सील करण्यात आले असून सोमवारी शहरातील विविध पाच भागात भाजी बाजार भरवण्यात आला असल्याने त्याचे  काटेकोरपणे पालन करून बाजार 11 वाजताच बंद झाला आहे

भरधाव डंपरची कारला धडक ; एक ठार, दोन जखमी

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । भरधाव डंपरने कारला दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी जळगाव ते भुसावळदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील साकेगावनजीक घडली. तर या अपघातात दोन गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत असे की, राष्ट्रीय महामार्गावरील साकेगावनजीकच्या आयुष प्रोकॉन कंपनीच्या समोर आज दुपारी भरधाव डंपरने कार जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात एमएच१९ सीवाय – २२८० या क्रमांकाच्या भरधाव वेगाने धावणार्‍या डंपरने  एमएच-१८ डब्ल्यू ५७८२ या क्रमांकाच्या मारूती सुझुकी कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना तातडीने डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच साकेगावसह परिसरातून आयुष प्रोकॉनच्या कर्मचार्‍यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना रूग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेची रक्कम शेतकऱ्यांची खात्यावर हस्तांतरीत

0
farmer

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना (PMKISAN) अंतर्गत देशातील 9.50 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यातील (एप्रिल, 21 ते जुलै, 21) रूपये 19 हजार कोटीहून अधिक रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरणाचा कार्यक्रम दिल्ली येथून 14 मे, 2021 रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाइन पार पडला आहे.

हस्तांतरित केलेली रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. माहे फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून देशातील 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत रूपये 1.15 लाख कोटीहून अधिक रकमेचा लाभ देण्यात आला आहे. असे धीरजकुमार, आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्यात या योजने अंतर्गत सुरुवातीपासून दिनांक 13 मे, 2021 अखेर 105.30 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. 11 हजार 694 कोटी रकमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे. तसेच 14 मे, 2021 रोजीच्या कार्यक्रमात दिनांक 1 एप्रील, 2021 ते दिनांक 31 जुलै, 2021 या कालावधीकरिता देय आठव्या हप्त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकुण 95.91 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण रूपये 1 हजार 918 कोटीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला गेला.

चालू वर्षी भारतीय हवामान विभागाने सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचे अनुमान जाहीर केले आहे. पाऊस वेळेवर सुरू होऊन जूनमध्ये पेरणीच्या दृष्टीने हा लाभ खरीप 2021 हंगामात विविध कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असून यामुळे कृषी उत्पादन वाढीला चालना मिळणार असल्याचे धीरजकुमार, आयुक्त, कृषि तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख पीएम किसान, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

महाबीजच्या गुणवत्तापूर्ण बिजोत्पादनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

0
farmer

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करावी याबाबत संभ्रमावस्था आहे. ते ज्या पिकांची पेरणी करतात त्यातून उत्पादन होणाऱ्या बियाण्यास बाजारामध्ये योग्य भाव मिळेलच असेही नाही. परंतु महाबीजचे विविध पिकांच्या गुणवत्तापूर्ण पायाभुत बियाण्यापासून उत्पन्नात वाढ होते.

सदरील बिजोत्पादनातून उत्पादीत कच्चे बियाणे महामंडळाकडे जमा केल्याबरोबर 80 टक्के बाजारभावाएवढे पैसे बिजोत्पादकास त्वरीत मिळतात व त्यानंतर प्रक्रिया झालेल्या बियाण्यास बाजारभावापेक्षा 20 टक्के जास्त भाव मिळतो. तसेच बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना बिज प्रक्रियेसाठी वाजवी दरात जैविक खते व बुरशीनाशके उपलब्ध करुन देण्यात येतात. त्यामुळे सुध्दा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होते.

बिजोत्पादन कार्यक्रमाची आगावू नोंदणी दि. 20 मे, 2021 पर्यंत जिल्हा कार्यालय, महाबीज, जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक येथे करावी. या बिजोत्पादनामध्ये ज्युट, सु. ज्वारी, तूर, मुंग, उडीद, धान, सोयाबीन इत्यादी पिकांचे बिजोत्पादन घेतले जाते. शेतकरी बंधुनी जिल्हा कार्यालयास त्वरीत संपर्क साधावा व सदरील बिजोत्पादन कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन महाबीजचे विभागीय व्यवस्थापक श्री. साईप्रकाश नवोड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

यावल येथे इंधन व रासायनिक खते दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन

0
yawal

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । पेट्रोल डीझेल आणि रासायनिक खतांच्या दरवाढीचा आज सोमवारी यावल येथे राष्ट्रवादीतर्फे निषेध व्यक्त करत निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना निवेदन देण्यात आले.  यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.देवकांत पाटील, यावल शहराध्यक्ष हितेंद्र गजरे, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, समन्वयक  किशोर माळी, शहर उपाअध्यक्ष वीरेंद्रशिंह सिसोदिया, सचिव भूषण खैरे, तालुका संघटक भूषण नेमाडे, सद्दाम शेख आदी उपस्थित होते.

काय म्हटलं आहे निवेदनात

रासायनिक खतांच्या किंमतीत जी दरवाढ झाली आहे, ती कमी करावी. देशात झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करण्यात यावी. यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रातीलभाजपा सरकारचा जाहीर निषेध नोंदवत आहोत. यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्कत्र शेतकरी बांधवांकडुन पेरणीपूर्व शेतमशागतीच्या कामांना गती देण्यात आली आहे. पेरणीसाठी लागणाऱ्या बी- बियाणे, खतांसाठीच्या आर्थिक बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तयारी केली जात आहे. परंतु केंद्रशासनाकडून रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे. यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्यात व येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे.

तसेच गेल्या वर्षांपासून कोरोना प्रादूर्भाव त्याचप्रमाणे खरीप हंगामात सरासरी पर्जन्यमान होऊन ही उत्पादनात घट आली आहे. शिवाय शेत मालाला योग्य भाव न मिळल्यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. केमिकल व फर्टिलायझरचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे सर्व खत कंपन्याच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे सांगितले होते. परंतु यंदाचा खरीप हंगाम तोंडावर असतांनाच खत कंपन्यांनी अचानक खतांच्या किंमतीत मोठी दरवाढ केली असून बियाण्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे खते व बियाण्यांच्या विक्रीत, किंमतीत, पुरवठ्यात मोठा काळा बाजार होऊ नये, यासाठी या लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथकाची नेमणूक करावी.

त्याचप्रमाणे देशात झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ ही सुद्धा कमी करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑटोरिक्षात पारदर्शक पडदे लावण्याचे आवाहन

0
jalgaon auto riksha

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या दि. 29 एप्रिल, 2021 च्या आदेशान्वये फक्त अत्यावश्यक सेवेकरीता ऑटोरिक्षामधून कमाल 2 प्रवासी वाहतूकीची परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर परिणामकारकरित्या प्रभावी पध्दतीने आळा घालण्याकरीता या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी सर्व ऑटोरिक्षा चालकांची तसेच प्रवाशांची सुध्दा आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व प्रसार पूर्णपणे रोखणे अत्यावश्यक आहे. याकरीता जिल्हा प्रशासन यांचेकडून विविध मोहिमा व बंधने घालण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व ऑटोरिक्षा चालकांनी ऑटोरिक्षांमधील प्रवासी व चालक यांच्यात संपर्क होवू नये, याकरीता त्यांचे ऑटोरिक्षांमध्ये चालक केबीन व प्रवाशांना बसण्याची जागा या दरम्यान फायबर/प्लास्टीकचे अथवा इतर पारदर्शक पडद्याने विभाजन करावे जेणेकरुन होणारा संसर्ग टाळता येईल.

जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा चालकांनी याप्रमाणे त्यांच्या ऑटोरिक्षामध्ये सुधारणा करुनच प्रवासी वाहतूक करावी. जे ऑटोरिक्षाधारक या सुचनांचे पालन करणार नाहीत, अशा ऑटोरिक्षाचालकांविरुध्द दि. 16 मे, 2021 पासून मोटार वाहन कायदा 1988, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता अधिनियमातंर्गत कारवाई करण्यात येईल, याची सर्व ऑटोरिक्षाचालकांनी नोंद घ्यावी. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

इंधन आणि खतांच्या दरवाढ विरोधात मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

0
muktainagar

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । खरिप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक मिश्र खतांच्या किंमतीत आणि पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देऊन हि दरवाढ रद्द न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला.

यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु डी पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी प स सभापती राजेंद्र माळी, प्रदिप साळुंखे,माजी सरपंच प्रविण पाटील, बापु ससाणे, आसिफ बागवान, शिवराज पाटील,संजय कोळी, राजु कापसे, सुनिल काटे, सुनिल पाटील, राजु चौधरी, व पदाधिकारी उपस्थित होते.

 मोदी सरकार हाय हाय ,केंद्र सरकारचा निषेध असो, खतांची, पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. यावेळी दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे कियंदाचा खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे  त्यासाठी पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे.

परंतु गेल्या एक वर्षापासून असलेली कोरोनाची टाळेबंदी, आणि अवकाळी पर्जन्य, वादळ यामुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाला मोठा फटका बसला असल्या कारणाने झालेले उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे यंदाचा खरिप हंगाम जवळ आला असून त्यासाठी लागणारे खते, बियाणे यासाठी शेतकरी आर्थिक गणित जुळविण्याच्या तयारीत लागले आहेत. परंतु भाजपा शासित केंद्र शासनाने  रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ दरवाढ केल्यामुळे आधीच आर्थिक गर्तेत अडकलेला शेतकरी अजुन संकटात सापडला आहे.

पूर्वी 1185 ला मिळणारी डी ए पी ची गोणी आता 1900 रुपयाला मिळणार आहे,  10 : 26:26 च्या 50 किलो गोणीची किंमत 1175 होती तीआता 1775 ला मिळणार आहे अशाप्रकारे  सर्वच मिश्रखतांच्या किंमतीत भाजपाशासित केंद्र सरकारने 15 ते 17 टक्के दरवाढ केली आहे. हि दरवाढ शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडणारी आहे. त्याचबरोबर आता पेरणीपुर्व मशागती सुरू असुन यासाठी ट्रॅक्टर ला डिझेल ची आवश्यकता असते केंद्र शासनाने डिझेल च्या किंमतीत प्रचंड वाढ केली असल्या कारणाने शेती मशागतीचे ट्रॅक्टरचे दर सुद्धा वाढले आहेत.

पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. पेट्रोल डिझेलची हि दरवाढ सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरची आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या खतांच्या , आणि इंधन दरवाढीचा जाहीर निषेध करतो. व शासनाचा प्रतिनिधी या नात्याने आपणास विनंती करतो आपण आमची मागणी केंद्र शासनाकडे पोहचवून हि दरवाढ रद्द करण्यात यावीअन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.