जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ । जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केट कमेटीने शॉपींग कॉम्प्लेक्स बांधा वापरा व हस्तांतरीत करा (B.O.T.) या तत्वावर बांधकामाचा ठेका दिलेल्या ठेकेदाराचा आर्थिक फायदा होईल म्हणून व मार्केट कमेटीचे आर्थिक नुकसान होत असल्याने तसेच पणन विभागाने दिलेल्या परवानगीच्या व्यतिरीक्त बांधकाम करुन शासनाची व कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक केली म्हणून सहकार व पणन विभागाने मार्केट कमेटीला बांधकामासाठी दिलेली परवानगी रद्द करावी. तसेच ठेकेदाराविरुध्द व कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव यांचे संचालकाविरुध्द कायदेशिर कारवाई करून याप्रकरणी झालेल्या बेकायदेशिर कामकाजाची शासन स्तरावरुन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची समिती नेमावी, अशी मागणी ऍड.विजय भास्करराव पाटील यांनी सहकार व पणन मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, या घोटाळ्यात माजी मंत्री गिरीष महाजन, प्रकाश जाखेटे, श्रीकांत खटोड, संदीप भोरटक्के हे सहभागी असून १० टक्क्यात आमदार राजुमामा भोळे हे देखील असण्याची शक्यता ऍड.पाटील यांनी व्यक्त केली आहे.
ऍड.विजय पाटील यांनी १८४ गाळे बीओटी तत्वावर विकसित करण्यासंदर्भात राबविण्यात आलेल्या सर्व प्रक्रियेविषयी आणि त्यात वेळोवेळी झालेल्या नियमांच्या उल्लंघनाबाबत निवेदनात माहिती दिलेली आहे.
ऍड.पाटील यांनी निवेदनात, १) सदर प्रकरणी झालेल्या गैरप्रकाराची व आर्थिक घोटाळ्याची, कृषी उत्पन्न बाजार समितीची व शासनाची वेळोवेळी फसवणूक केल्या प्रकरणी शासकीय उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी ही कालमर्यादित वेळेत करण्यात यावी.
२) म. अवर सचिव महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र. कृउबा ०९१४/प्र.क्र. १५५/२१-सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय विस्तार मुंबई-३२ यांनी दिनांक ५ सप्टेंबर २०१४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगांव या बाजार समितीच्या १८४ गाळे बी.ओ.टी.तत्वावर विकसित करण्याच्या प्रस्तावास वरील संदर्भ क्रमांक १ प्रमाणे मान्यता दिलेली आहे तरी ती मान्यता वरील निवेदनातील बेकायदेशिर बाबी लक्षात घेऊन तात्काळ रद्द करण्यात यावी.
३) कृषी उत्पन्न बाजार समितीने दिनांक २९/०१/२०१४ रोजी संचालक मंडळाच्या सभेमध्ये झालेल्या सभेत ठराव क्रमांक-११ पासून सुरु केलेली गाळे बांधणेबाबतची संपूर्ण प्रक्रिया, आजपावेतो झालेले ठराव व करारनामे व आजपर्यंत वेळोवेळी झालेले सर्व बेकायदेशिर कामकाज रद्द करण्यात यावेत.
४) कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगांव यांचे आज रोजी अस्तित्वात असलेले संचालक मंडळ यांनी या प्रकरणी विकासकाच्या बाजूने केलेले बेकायदेशिर ठराव व विकासकाचे आर्थिक हित वेळोवेळी जोपासले असल्या कारणाने व कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव या संस्थेचे जाणून-बुजून कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान केलेले असल्याने सदरचे संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करुन कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव या संस्थेवर शासकीय प्रशासक यांची नियुक्ती करण्यांत यावी.
५) सदर गाळे बांधकाम विकासक व त्याचे कथीत भागिदार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व संबंधीतांविरुध्द शासनाची व कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव या संस्थेची आर्थिक फसवणूक व कोट्यावधी रुपयांचे नुकसान केले म्हणून त्यांचेविरुध्द फौजदारी स्वरुपाची कारवाई करुन संबंधितांविरुध्द शासनातर्फे गुन्हे दाखल करण्यात यावेत.
६) सदर प्रकरणाच्या चौकशी कामी मला या प्रकरणात वेळोवेळी माझे म्हणणे मांडण्याची व कागदपत्रे सादर करण्याची परवानगी मिळावी, हे प्रमुख मुद्दे मांडत विनंती केली आहे.
ठळक मुद्दे :
बांधकाम नियमबाह्य वाढवून तिप्पट केले.
१८४ दुकानांची परवानगी, २०० दुकाने बांधली.
एफएसआय संपलेला असताना परवानगी घेतली.
मार्केटच्या संचालकांना एक-एक दुकान मंजूर केले.
संचालकांच्या मालमत्तेची चौकशी करा.
जामनेरला शेतकी संघाची जागा हडप केली.
वृक्षतोड केल्याचा दंड अद्याप भरला नाही.