⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024

खुशखबर : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा कायम प्रवास भत्ता वाढविला

0
currency india

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ । जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करुन तो 1500 रुपये इतका करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

ग्रामपंचायत स्तरावरील मुलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून त्यात महत्वाची भुमिका ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर, महसूल विभागात जिल्हाधिकारी कार्यालयात, विभागीय आयुक्त कार्यालयात ग्राम सेवक /ग्राम विकास अधिकारी यांना बैठकांना हजर रहावे लागते.

तसेच, ग्रामीण स्तरावर दिवाबत्ती, पाणीपुरवठा साहित्य, आरोग्य संबंधीत साहित्य, वेगवेगळ्या योजनांची बांधकाम साहित्य तसेच कर वसूली भरण्याकरीता तालूका स्तरावर जावे लागते.

बचतगटांच्या कर्जमंजूरीसाठी तालुका पातळीवर बॅंकांना भेटी द्याव्या लागतात. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींना घर बांधणीचे सामान उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरावे लागते.  ग्राम पंचायत हद्दीत ग्रामपंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या पुर्ततेसाठी ग्रामसेवकांना फिरती करावी लागते. या सर्व मुद्द्यांचा विचार करता ग्राम सेवक/ ग्राम विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना ठोक स्वरुपात दरमहा देण्यात येणाऱ्या 1100 रुपये या कायम प्रवास भत्त्याच्या रक्कमेत सुधारणा करणे गरजेचे होते.

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जूनपासून

0
examinations for medical

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ ।  राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिली.

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या  परीक्षां संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस.,बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा  समावेश आहे.

या वैद्यकीय पदवी  परीक्षां सोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विक्रीस बंदी असलेले 5 हजाराचे कापूस बियाणे जप्त

0
cotton beej

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ । शासनाकडून मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत गुजरात येथील एचटीबीटी कापूस बियाणे आणून विक्री करणाऱ्या मे. श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशन, कारंजा चौक, अमळनेर येथे अरुण श्रीराम तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव यांनी वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांसमवेत सापळा रचून 5 हजार रुपये किंमतीचे 5 कापूस बियाणे पाकिटे जप्त केल्याची माहिती संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

याबाबत मे. श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशन, कारंजा चौक, अमळनेर चे मालक श्री. जितेंद्र दिनकर पाटील, अंमळनेर यांचेविरुध्द बियाणे नियम 1968 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 नुसार अमळनेर पोलीस स्टेशन येथे 227/2021 देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, वैभव शिदे, तालुका कृषि अधिकारी, अमळनेर भरत वारे, मोहिम अधिकारी पी. एस. महाजन, जिल्हा परिषद, जळगाव, अमोल भदाणे, कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती, अमळनेर गणेश पाटील, व कृषि सहाय्यक अमळनेर यांच्या सहकार्याने पार पडल्याचे श्री. ठाकूर यांनी कळविले आहे.

चप्पलच्या ठशांचा धागा पकडत गुन्हा उघड

0
jalgaon

जळगाव एमआयडीसीतील एका कंपनीत रोख ३० हजार रुपयांच्या चोरीची घटना घडली असता यात संशयित आरोपीस मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. अरविंद अरुण वाघोदे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, जळगाव एमआयडीसी व्ही सेक्टर परिसरातील महेश प्लास्टिक इंडस्ट्रीज या कंपनीत १३ मे रोजी चोरी झाली होती. त्यात रोख रकमेसह एकुण तिस हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल चोरीस गेला होता.

सदर चोरीचा प्रकार 15 मे रोजी उघडकीस आल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक तुषार राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सफौ अतुल वंजारी,  पोलीस नाईक इम्रान सय्यद, पोका. गोविंदा पाटील, सुधीर साळवे आदी करत होते. तपासादरम्यान घटनास्थळी चपलेचे ठसे मिळून आले होते. चपलेच्या ठशांसह इतर माहितीच्या आधारे तपासाला गती देण्यात आली होती.

सदर चोरीचा प्रकार सुप्रिम कॉलनी परिसरातील अरविंद अरुण वाघोदे याने केला असल्याची गोपनीय माहीती तपास पथकातील कर्मचारी इमरान सैय्यद यांना समजली. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक इमरान सैय्यद, पो.कॉ. गोविंदा पाटील, सुधीर साळवे आदींनी अरविंद अरुण वाघोदे याला मुद्देमालासह शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात यश मिळवले. ताब्यातील व अटकेतील अरविंद वाघोदे याच्यावर यापुर्वी देखील विस लाख रुपये चोरीचा गुन्हा दाखल आहे.

महात्मा फुले हायस्कूल येथे खासदार स्व. राजीव सातव यांना श्रध्दांजली

0
erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ ।  महात्मा फुले हायस्कूल एरंडोल येथे युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार स्व.राजीव सातव यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

सदर प्रसंगी  माजी नगराध्यक्ष देविदास महाजन शालेय समितीचे चेअरमन अरुणकुमार माळी सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  विजय महाजन यांनी स्व.राजीव सातव यांच्या सामाजिक ,राजकीय, कार्याला उजाळा दिला. या प्रसंगी मान्यवरांनी स्व.खासदार राजीव सातव हे तळागळातील लोकांसाठी काम करणारे व महाराष्ट्रातील एक अभ्यासू ,उमदे नेतृत्व होते अल्पावधीत त्यांनी आपल्या कार्याने उतुंग यश संपादन केले होते अशा भावना या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केल्या.

सदर श्रध्दांजली पर कार्यक्रमास शिवसेनेचे जेष्ठ नेते रमेश महाजन,सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मनोहर महाजन,सुदर्शन महाजन,सामाजिक कार्यकर्ते सागर महाजन,महात्मा फुले हायस्कूल चे मुख्याध्यापक विनोद जाधव ,काँग्रेसचे शहाराध्यक्ष संजय भदाणे, संजय कलाल,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सदर श्रध्दांजली पर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश चव्हाण  यांनी केले कार्यक्रमा च्या शेवटी स्व.खासदार राजीव सातव यांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.

राज्यात स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना राबविणार ; ना.गुलाबराव पाटील

0
gulabrao patil

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ । उन्हाळ्यातील 3 ते 4 महिने आणि अन्य कारणांमुळे काही विशिष्ट कालावधीत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणाऱ्या राज्यातील गावे/ वाड्या-वस्त्या यांच्यासाठी पाण्याची साठवणूक करून पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कालावधीमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना’ या नावाने सर्वसमावेशक योजना राबविण्यात येणार आहे अशी माहिती, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

राज्यात सुमारे 42.5 टक्के क्षेत्र (173 तालुके) हे अवर्षण प्रवण (टंचाई ग्रस्त) क्षेत्र आहे. राज्याची भौगोलिक रचना लक्षात घेता मोठ्या प्रमाणात भूजल उपलब्धता हंगामी स्वरूपाची असते. ज्यामुळे राज्यातील अनेक गावे/ वाड्या/ वस्त्यांना शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. सध्याच्या परिस्थितीत राज्यामध्ये पडणाऱ्या पावसाच्या पैकी 70 % पाणी वाहून जाते व बाष्पीभवन होते. त्यामुळे या समस्येवर उपाययोजना म्हणून “कॅच द रेन” या तत्वावर नव्याने योजना अस्तित्वात आणणे गरजेचे होते.म्हणून “कॅच द रेन” बाबतीत धोरण ठरविण्यासाठी संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. सदर समितीच्या अहवालानुसार नवीन योजना करण्याचे प्रस्तावित केलेले आहे. त्यानुसार “स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना” सुरू करण्यात येत आहे अशी माहिती, मंत्री श्री.गुलाबराव पाटील यांनी दिली.

ही  योजना किमान 50 ते 500 लोकसंख्या असलेल्या गावे/ वाड्या/ वस्त्यांमध्ये कार्यान्वित करण्यात येईल. या योजनेद्वारे पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी उन्हाळ्यापर्यंत साठवण टाकीत साठवून ठेवून शुध्दीकरणाची प्रक्रिया करून पुरविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

योजनेची मार्गदर्शक तत्वे व गाव निवडीचे निकष: 

सदर योजना ही ग्रामीण भागातील प्रत्यक्ष पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कालावधीकरीता असेल. ही योजना अतिदुर्गम क्षेत्रातील, डोंगराळ भागातील, आदिवासी क्षेत्रातील, अवर्षण ग्रस्त तसेच टँकरग्रस्त गावांकरिता असेल. त्यासाठी आवश्यक ती जनजागृती करण्यात येईल. योजना ही मूळ योजनेस पूरक योजना म्हणून घेण्यात येईल. योजनेचा स्त्रोत म्हणून पावसाचे पाणी, झरे, पाझर, ओढे, नाले इत्यादी वापर करण्यात येईल.

योजनेअंतर्गत हाती घ्यावयाच्या उपाययोजना:- 

पावसाळ्यात सहजपणे उपलब्ध होणारे शुद्ध व स्वच्छ पाणी उन्हाळ्यापर्यंत मेटॅलिक पध्दतीच्या साठवण टाक्या, फेरोसिमेंट अथवा आर. सी. सी. सिमेंटच्या साठवण टाक्या, जलकुंभ/ साठवण टाक्या, पावसाचे पाणी/ झऱ्याच्या पाण्यावर आधारित साठवण तलाव, फेरोसिमेंटच्या छोट्या टाक्या (पागोळी विहीर) किंवा बंद असलेल्या भूमिगत साठवण टाक्या यामध्ये साठवून ठेवून पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कालावधीत लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेची अंमलबजावणी निकष :- 

योजनेच्या प्रशासकीय मंजुरीचे तथा अंमलबजावणीचे अधिकार रू. 15 लक्ष पर्यंत ग्रामपंचायतीस असेल व रू. 15 लक्ष पेक्षा जास्तीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना राहतील. जिल्ह्याच्या एकत्रित प्रस्तावास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा समितीद्वारे मान्यता देण्यात येईल. सदर योजनेस जल जीवन मिशन कार्यक्रम, व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व निधी, 15 व्या वित्त आयोग, जिल्हा नियोजन समितीकडे उपलब्ध निधी या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहितीही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार शकील शेख तर उपाध्यक्ष सरफराज शेख

0
raver

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ । रावेर तालुक्यातील कर्जोद या गावातील ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार शकील अब्दुल शेख यांची  तिसऱ्यांदा तर उपाध्यक्षपदी हाजी सरफराज शेख यांची बनिवड करण्यात आली असल्याची माहिती सरपंच सौ अरुणा महाजन व उपसरपंच नरेंद्र महाजन यांनी दिली.

गावात शांतता राहावी, व गाव तंटामुक्त रहावे म्हणून उपसरपंच  नरेंद्र महाजन व सरपंच सौ अरुणा महाजन  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेत गाव तंटामुक्त करून गावाला तीन लाखाचा पुरष्कर मिळवून गावाच्या विकासात भर पाडणारे शकील शेख याना तिसऱ्यांदा समितीचा अध्यक्ष बनविण्यात आले आहे.  या सभेत विविध कामांविषयी चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी मांडलेल्या शंका व सूचनांचे या सभेत निरसन करण्यात आले. गावात वृक्षलागवड, संगोपन, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते दुरुस्ती या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी हाजी अनिस शेख,ग्रामसेविका सौ कविता बोदवडे,सदस्य अशोक वणारे, वेंकट ससाणे, राजेंद्र तडवी, इशवर महाजन, विनोद सावळे, अकील खान, कुमारी रेखा ससाणे, पोलीस पाटील अमोल महाजन, आशिष पाठक,  यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

शकील शेख यांच्या प्रयत्नाने २०१५/१६ मध्ये गाव तंटामुक्त होऊन शासनाने गावाला तीन लाख रुपयांचा धनादेश रावेर ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास बाबा काळे यांच्या हस्ते अध्यक्ष शकील शेख व सरपंच याना दिला होता.

कसारा घाटात अपघात, बदरखे येथील एक ठार, १० जखमी

0
jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ । मुंबई-नाशिक महामार्गावरील कसाराजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने क्रूझरचा भीषण अपघात होऊन यात एक ठार, १० जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडलीय.  दरम्यान, जखमीं पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत असे की, कल्याणहुन चाळीसगावकडे जाणारी क्रूझर (गाडी क्रमांक- MH20CH5513) ही भरधाव वेगात नाशिकच्या दिशेने जात होती. यावेळी, कसारा बायपास जवळील आडमाळ गावालागत असलेल्या वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्यालगत 20 मीटर अंतरावर असलेल्या एका महाकाय दगडावर जाऊन आधळली. या भीषण अपघातात राजेंद्र नामदेव पवार (वय 45, रा. खडकपाडा, कल्याण.) हे  जागीच ठार झाले.

आपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के. ए. नाईक, पोलीस कर्मचारी रामदास राठोड, अशोक इखणकर, अनिल निवळे, आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदत कार्य सुरू केले. पाऊस व अंधार असल्याने क्रूझर गाडीत अडकलेल्याना बाहेर काढण्यात व्यत्यय येत होता, तरी अथक प्रयत्न करून 14 मिनिटांत पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी अडकलेल्याना बाहेर काढले. या प्रकरणी कसारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अपघाताती जखमींचे नाव 

संदीप पंडित परदेशी (रा, डोंबिवली) यांचा हात तुटून ते गंभीर जखमी झाले. याशिवाय, भारती शंकर परदेशी यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी आहेत, राजेंद्र तुकाराम गढरी, चालक (रा. बदरके, जळगाव), विशाल नामदेव गढरी, तुषार दिपक परदेशीं, शकुंतला नामदेव गढरी, हर्षल मधुकर गढरी, श्रेयस अरुण गढरी, भावेश अरुण गढरी आणि सनी महादू गढरी (सर्व रा कल्याण) हे जखमी झाले आहेत. जखमींना एका खासगी पिकअप गाडीने कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यांपैकी संदीप परदेशी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कल्याण येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

शिवसेनेचा महावितरणला झटका : वाढीव बिले केली कमी

0
13 15 36 images

जळगाव लाईव्ह न्यूज ! १९ मे २०२१ ! कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महावितरणने वाढीव वीज बिलांचा शॉक दिला होता. श्रीनगर, खळवाडी, हुडको कॉलनी, भोई नगर, कांशीराम नगर विभागातील अनेक वीज ग्राहकांना मे महिन्यात वापर नसलेली अतिरिक्त देयके मिळाली. शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी याबाबत महावितरणच्या कार्यालयात पाठपुरावा केला असता १ हजार ते १७ हजार रुपयांपर्यंत वीज देयकात दुरुस्ती केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

१७ हजारापर्यंत देयकात दुरुस्ती:
धंनजय सोनवणे- ४८९३ रुपये, काशिनाथ गुळवे- १०५८० रुपये, मधुसूदन ढाके-१०६९२ रुपये, अशोक सोनवणे- ९०४९ रुपये, ज्ञानदेव गुळवे- ५७३९ रुपये, राजेश पाटील-१३६१ रुपये, अरुण गोविंदा लोखंडे- १७३११ रुपये, निर्मला पाटील-१२७५ रुपये, राधाबाई शंकर सोनवणे- १२०१३ रुपये, चंद्रकांत पाटील- ४७७१ रुपये व नलिणी अरुण तळेले- ११४५६ रुपयांची दुरुस्ती होऊन रक्कम देयकातून कमी करण्यात आली आहे. तब्बल १२ ग्राहकांची एकूण १ लाखापर्यंतची रक्कम दुरुस्त झाल्याने ग्राहकांनी शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख श्याम श्रीगोंदेकर, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, शहरप्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

अधिकाऱ्यांना निलंबित करा:
लॉकडाउनच्या काळात वीजग्राहकांना भरमसाठ वीज बिले पाठवल्यानंतर राज्य सरकारसह ऊर्जा विभागाला तीव्र असंतोषाचा सामना करावा लागला होता. परंतु तक्रार केल्यानंतर जिनस मीटर कंपनीने वेळीच अपडेट केले नाही आणि रिडींग एजन्सीने ग्राहकांना वेळेत देयक सादर केले नाही व रिडींगमध्येही वारंवार चुका केल्या हे आता सिद्ध झाले आहे. दोन्हीही एजन्सीवर कडक कारवाई न करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी ग्राहकांनी केली आहे.

कोर्टात जनहित याचिका दाखल करणार:
महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्राहक जे बिल असेल ते भरायला तयार आहे. पण ते वीज बिल नेमकं आणि अचूक असावं, हीच ग्राहकांची अपेक्षा आहे. लॉकडाऊनमुळे हातात कमी पैसे असताना हजारोंच्या घरात अतिरिक्त रक्कमेची देयके एजन्सीच्या चुकीने ग्राहकांना दिले. वारंवार चुका करणाऱ्या एजन्सीवर कारवाई न झाल्यास कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात येईल असे प्रा.धिरज पाटील यांनी कळविले आहे.