पाणीटंचाईच्या निषेधार्थ भाजपाचे मटके फोडो आंदोलन
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । वरणगाव शहरात ऐन उन्हाळ्यामध्ये दहा ते बारा दिवसांनी पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला समोर जावे लागत आहे. शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठी भाजपतर्फे पालिकेत मटके फोडो आंदोलन करण्यात आले. आठ दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा, माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पालिका प्रशासनाला दिला.
भाजपातर्फे झालेले आंदोलन हे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रणिता पाटील चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. पालिक प्रशासन अधिकारी पंकज सूर्यवंशी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. वरणगाव शहरात १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे दिवस कसे कमी करता येतील, यासाठी एकत्रित बैठक घेण्यात येईल व उपाययोजना केल्या जाणार आहेत. तसेच शहरासाठी नवीन योजना मंजूर करण्यात आली आहे. नवीन मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने व्हावे, योजनेचे उर्वरित काम लवकर पूर्ण करावे अश्या सूचना यासाठी पाठवतो असेही प्रशासन अधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी भाजपतर्फे या योजनेचे काम जाणीवपूर्वक संथगतीने केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सदर मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने करावे. तसेच वरणगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आठ दिवसात संपूर्ण वरणगाव शहरातील जनतेला आव्हान करून भाजप मोठे आंदोलन करेल असा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणा देऊन पालिका परिसर दणाणून सोडला.
यावेळी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष प्रणिता पाटील, कस्तुरा चौधरी इंगळे, नीता तायडे, माजी नगरसेविका माला मेढे यांच्यासह भाजपचे शामराव धनगर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, भाजयुमो शहराध्यक्ष आकाश निमकर, रॉकी कश्यप, पप्पू ठाकरे, जिल्हा सरचिटणस डॉ.सादिक, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, कैलाश पाटील, गंभीर माळी, बापू माळी, बळीराम सोनवणे, रमेश पालवे, राहुल जंजाळे, जितेंद्र मराठे, आकाश मराठे, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष शशिकांत चौधरी, कामगार नेते मिलिंद मेढे आदी उपस्थित होते.