जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२५ । राज्यातील होऊ घातलेल्या २९ महापालिका निवडणुकासाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अखेरचा दिवस असल्याने सर्वच पक्षांमध्ये जोरदार हालचाली पाहायला मिळाल्या. काही इच्छुकांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते, तर अनेक पदाधिकाऱ्यांना ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, ठिकठिकाणी स्थानिक पातळीवरील स्थिती लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच भाजपामध्ये युती झाली आहे. तर काही ठिकाणी या दोन्ही पक्षांनी युती तोडत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. दरम्यान, राज्यात एकूण 14 ठिकाणी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युती तुटली आहे.

काही महानगरपालिकांमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्याने पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. तर काही ठिकाणी शिंदे गटाने युती करण्यास स्पष्ट नकार दिला. स्थानिक राजकीय गणिते आणि परिस्थिती लक्षात घेता दोन्ही पक्षांनी काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या महापालिकेत शिवसेना-भाजपची युती तुटली
या दोन्ही पक्षांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना या महानगरपालिकांच्या निवडणुकीत युती नसेल. या सर्वच ठिकाणी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील.
वरील 14 महापालिकांमध्ये महायुती तुटली असली तरी मुंबई, ठाणे यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांत मात्र शिंदे गट आणि भाजपा यांच्यात युती होत आहे. या ठिकाणी अजित पवार यांना मात्र त्यांनी दूर ठेवले आहे.






