⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

चर्चा तर होणारच …भाजपाचे आमदार म्हणाले, पुढार्‍यांच्या पाया पडू नका

जळगाव लाईव्ह न्यूज | १४ डिसेंबर २०२२ | हिंदू धर्म संस्कृतीत मोठ्यांच्या पाया पडण्यास संस्कार मानले जाते. आई, वडील, वडीलधारी मंडळी, गुरू आणि आदरणीय व्यक्तींच्या पाया पडण्याची आपल्याकडे प्रथा आहे. परमेश्वराची आराधना करतानाही म्हणूनच ‘घालीन लोटांऽगण, वंदीऽन चरण, डोळ्याने पाहीऽन रूऽप तुझेऽ’ असे म्हटले जाते. मात्र अलीकडच्या काळात राजकारण्यांच्या पाया पडण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राजारणी वयाने लहान असला तरी त्याच्या पाया पडण्यात धन्यता मानणारी वृत्ती कार्यकर्त्यांमध्ये वाढत आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात पाया पडण्याच्या या वृत्तीवर चर्चा सुरु होण्याचे कारण म्हणजे, भाजपाचे आमदार संजय सावकारे यांनी केलेले एक विधान!

भाजपाचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने बियाणी स्कूलच्या पटांगणावर सावकारे मित्र परिवारातर्फे सत्कार समारंभ पार पडला. यावेळी बोलतांना आमदार सावकारे म्हणाले की, आपल्या आई-वडिलांच्या व देवाच्या जरुर पाया पडाव्या, पण माझ्या किंवा कोण्या पुढार्‍यांच्या पाया पडू नका. अलीकडच्या काळात पुढार्‍यांना स्वत:चे पाय पाडून घेण्याची मोठी हौस असते. अनेक नेते पाया पाडून घेण्यासाठी सकाळपासून दरबार भरवून बसले असतात. एखादा कार्यकर्ता पाया पडला नाही म्हणून त्याला रडारवर घेतले जाते. तर काही ठिकाणी काहींना नेत्यांपुढे चापलूसी करण्याची मोठी हौस असल्याने ते स्वत:चा नेत्यांच्या पाया पडण्याचा बहाणा शोधत असतात. नेत्यांच्या पायावर पडल्याने त्यांना धन्यता मिळते. एकंदरीत, राजकारणातील पाया पडणे याला संस्कार कमी आणि प्रवृत्ती अधिक कारणीभूत ठरत असते. त्यामागे स्वार्थ दडला असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘राजकारणात पाया पडणे बंद करा.’ एक विधान मागे केले होते, नितीन गडकरी यांनी भाजपाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनीसुद्धा असेच विधान केले होते. मात्र राजकारणात पाया पडण्याची दिखावू संस्कृती कमी होण्याऐवजी वाढतच आहे. अशात आमदार संजय सावकारे यांनी केलेले विधान निश्‍चितपणे कौतूकास्पद आहे. जाहीरपणे असे विधान करायला धाडस लागते. मात्र आमदार सावकारे यांनी स्वत: देखील या नियमाचे पालन करायला हवे. हा बदल एका दिवसात होणार नाही मात्र याची सुरुवात होण्याची आवश्यकता आहे.

पाया पडण्याचे आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व

पाया पडणे हा आपल्याकडील फार मोठा संस्कार आहे. पण, या संस्कारामुळे आपल्याला कळत-नकळत काहीतरी प्राप्त होत असते. यासाठी पाया पडण्याचे आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व समजून घेतले पाहिजे. पायाच्या अंगठ्यात विशेष शक्तीचा संचार होतो. अंगठ्यात विद्युत संप्रेषणीय शक्ती असते. याच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडण्याने ती शक्ती आपल्याला मिळते आणि प्रगती होते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे. देवाचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात आणि पुण्यामध्ये वाढ होते. यामागचे वैज्ञानिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जोड ताणले जातात. त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होते. हा एकप्रकाराचा व्यायाम आहे. खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्त प्रवाह वाढतो, जो डोळ्यांसाठी चांगला असतो. तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार कमी होतो. वडीलधार्‍या मंडळींबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते.