जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । भारतीय जनता पार्टी (भाजप) नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या अवघ्या 41 वर्षांच्या होत्या. सोनाली फोगट या काही स्टाफ मेंबर्ससोबत गोव्याला गेल्याचे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यांची प्राणज्योत मालवली. Sonali Phogat passed away
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल
उत्तर गोव्याच्या डीजींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगटच्या मृत्यूची माहिती उत्तर गोव्यातील एसटी अँटनी रुग्णालयातून पोलिसांना मिळाली. यानंतर स्थानिक पोलिस हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि नंतर हॉटेलमध्ये जातील. डीजीच्या म्हणण्यानुसार, मृत्यूचे कारण आत्ताच सांगता येणार नाही. तपास आणि शवविच्छेदनानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सोनाली या अभिनयविश्वात काम करत होत्या आणि त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. टिक टॉकवर त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. दररोज त्या टिक टॉकवर अनेक नव-नवे व्हिडीओ बनवून पोस्ट करायच्या. त्यांना टिकटॉक स्टार (Tiktok Star Sonali Phogat) म्हणूनही ओळखलं जायचं.
बिग बॉसच्या 14 व्या पर्वातही त्यांनी हजेरी लावली होती. 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आदमपूर मतदार संघातून त्यांनी हरियाणातून कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तिथे त्यांचा 29 हजार मतांनी पराभव झाला होता.
सोनाली फोगाट यांचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबाद इथं झाला. त्यांनी 2006 मध्ये हिस्सार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करून करिअरची सुरुवात केली होती. दोन वर्षांनंतर 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या. सोनाली यांचे वडील शेतकरी आहेत.