जळगाव जिल्हाराजकारण
…ही जनतेच्या मनातील इच्छा, गिरीश महाजनांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांचे हल्ले सुरूच असून आता माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जनादिवशीच सरकारच्या विसर्जनावर जोर दिला आहे.
‘राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही जनतेच्या मनातील इच्छा आहे’, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी जळगावात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य आहे. करोना लसीकरण महाशिबिराचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजन हे जळगावात आले होते.
यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन व्हावे, हे सरकार पायउतार व्हावे, असे आमच्यापेक्षा जनतेलाच वाटतं आहे. राज्यातील जनता त्रस्त झाल्याचे आज आपण सर्वजण बघत आहोत. जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी असे सर्वांचेच प्रश्न कायम आहेत. महाविकास आघाडी सरकारला सर्वच घटक कंटाळले आहेत. आज जी वेळ राज्यावर आली आहे, ती कधीही आलेली नव्हती. अतिशय दुर्दैवी वेळ या सरकारने आणल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात आता बदल झाला पाहिजे, हे जनतेच्याच मनात आहे. हे सरकार जाऊन भाजप सरकार आले तर सर्वांना न्याय मिळेल. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावत आहोत. आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे राज्यभर दौरा करत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असेही गिरीश महाजन यावेळी बोलताना म्हणाले.