⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्याग व बलिदानामुळेच भाजप जगातील क्रमांक एकचा पक्ष

जळगाव लाईव्ह न्यूज : ७ एप्रिल २०२३ : आपला पक्ष जनतेच्या भावना व अपेक्षांनुरूप कार्य करीत आहे. त्यामुळे लोकांमध्ये जाऊन काम करणारे कार्यकर्ते त्याचा आधार आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्याग व बलिदानामुळे भारतीय जनता पक्ष जगातील क्रमांक एकचा पक्ष झाला आहे, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

भाजप जळगाव जिल्हा व महानगरातर्फे पक्षाच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त बळिराम पेठेतील पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शहरातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार सुरेश भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रथम भारतमाता, पंडित दीनदयाल उपाध्याय, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालंचद पाटील, महापालिकेचे गटनेते राजेंद्र घुगे पाटील, ग्रामीणचे प्रभाकर पवार उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अराजकीय, सामाजिक, क्रीडा, वैद्यकीय, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४३ नागरिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे पुस्तक देऊन सत्कार झाला.

आमदार सुरेश भोळे यांनी कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, की जनसंघ ते भाजप, असा पक्षाचा प्रवास असून, ४३ वर्षांमध्ये पक्षाने विश्वात एक नंबरचा पक्ष म्हणून नावलौकिक मिळवला आहे. तळागाळापर्यंत विविध योजना पोचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी केले आहे. भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष असून, ३६५ दिवस अहोरात्र मेहनत करणारा भाजपचा कार्यकर्ता आहे.

नंतर पक्ष कार्यालयापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. पक्षाचे सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.