जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा गड सर करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असताना, यंदाचा प्रचार मैदानापेक्षा मोबाईलच्या स्क्रीनवर अधिक रंगताना दिसत आहे. पारंपारिक जाहीर सभा आणि कोपरा सभांच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पक्षाने ‘एआय’ आणि हॉलिवूडच्या ‘मार्व्हल’ पात्रांचा आधार घेत एक नवा प्रयोग राबवला आहे. या अनोख्या डिजिटल रणनीतीमुळे सध्या राजकीय वर्तुळात भाजपची चर्चा आघाडीवर असून विरोधक मात्र काहीसे पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे.
यंदाच्या निवडणुकीत तरुण मतदारांची संख्या निर्णायक आहे. हीच नस ओळखून भाजपने आपल्या सोशल मीडिया मोहिमेत आयर्न मॅन, स्पायडरमॅन आणि थानोस यांसारख्या काल्पनिक महानायकांचा वापर केला आहे. हे सुपरहिरोज मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे, पाणीप्रश्न आणि विकासकामांवर थेट भाष्य करत असल्याने महाविद्यालयीन तरुणांमध्ये भाजपच्या या कल्पकतेची मोठी चर्चा आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या या व्हिडिओजनी प्रचाराचा दर्जा उंचावला असून, इतर पक्षांना या स्तरावर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

प्रचाराच्या या रणधुमाळीत भाजपने ‘मुंबई आता थांबणार नाही’ असा नारा देत विकासाचे एक नवे चित्र मांडले आहे. विशेष म्हणजे, उबाठा गटाच्या जुन्या आणि गाजलेल्या जाहिरातींचा संदर्भ वापरून त्यांनाच पेचात टाकण्याची रणनीती भाजपने आखली आहे. सोशल मीडियाच्या प्रत्येक व्यासपीठावर एकाच प्रकारची मांडणी केल्यामुळे मतदारांमध्ये भाजपचा संदेश ठळकपणे पोहोचत आहे.

दुसरी बाजू पाहिली तर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सध्या कोस्टल रोड आणि इतर विकासकामांच्या श्रेयावरून आक्रमक झाली आहे. मात्र, वर्षानुवर्षे सत्तेत राहूनही अनेक प्रकल्प का रखडले, असा प्रश्न आता सर्वसामान्य मुंबईकर विचारू लागला आहे. विरोधकांचा हा ‘श्रेयवादाचा’ लढा मुंबईकरांना कितपत भावतो, याबाबत आता राजकीय विश्लेषकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे. ‘रिअल टाइम’ प्रगतीचा दावा करणाऱ्या भाजपच्या डिजिटल लाटेसमोर विरोधकांचा पारंपरिक प्रचार काहीसा फिका पडू लागला आहे.
सध्याचे राजकारण हे केवळ आश्वासनांचे राहिले नसून ते ‘नरेटिव्ह’ सेट करण्याचे झाले आहे. भाजपने इन्स्टाग्राम रील्स आणि युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून सामान्यांच्या खिशातील मोबाईलपर्यंत मजल मारली आहे. छोट्या पण प्रभावी कंटेंटमुळे भाजपचा ‘रिकॉल व्हॅल्यू’ वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेची ही लढाई आता केवळ रस्ते आणि नालेसफाईच्या मुद्द्यांवरून सरकून आधुनिक तंत्रज्ञान विरुद्ध जुनी कार्यपद्धती अशा वळणावर आली आहे.


