जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपसह किसान मोर्चान जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्याकडे केली.

जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. या अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे कापूस, मका, केळी, सोयाबीन, ऊस, फळबाग व कडधान्य या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगफुटीमुळे शेत जमिनीचा पृष्ठभाग वाहून गेला आणि घरांची पडझड झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे पशुधन मोठ्या प्रमाणात वाहून गेले व मृत्युमुखी पडले आहेत. शेती बांध फुटून शेती उद्ध्वस्त झाली आहे. अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपसह किसान मोर्चान जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. भाजप पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, चिटणीस सुरेश धनके, जिल्हाध्यक्ष विजय दिनकर पाटील, सरचिटणीस राजेंद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष विजय महाजन (पाचोरा), देवेंद्र पाटील (चाळीसगाव), राहुल महाजन (रावेर), मनोज पाटील (पाचोरा) यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करून निवेदनाद्वारे मागण्या मांडल्या.
तातडीने पंचनामा करण्यात यावा, वाहून गेलेल्या जमिनीचा पंचनामा करून तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, बेघर झालेल्या लोकांना तातडीने घरे आणि जीवन अत्यावश्यक शेती निविष्ठा वस्तू पुरवठा करावा, ओला दुष्काळ जाहीर करावा, केळी पिकाला हमीभाव देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.







