जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । देशभरात भारत जोडो पदयात्रा घेऊन निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दौऱ्याला सध्या जोरदार प्रतिसाद लाभत आहे. राहुल गांधी यांची पदयात्रा महाराष्ट्रात पोहचली असून आज अकोल्यात त्यांची सभा देखील होणार आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी इंदूरमध्ये येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणारे पत्र एका मिठाईच्या दुकानात पोहचविण्यात आले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.
काँगेसचे नेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसापासून भारत जोडो पदयात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. राहुल यांची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात असून इथून पुढे यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणार आहे. त्यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हजारो लोक स्वत:हून या रॅलीत सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्याकडे तक्रारीही देत आहेत. तसेच त्यांना पाठिंबाही देत आहेत. महाराष्ट्रात आज अकोल्यात शेगाव येथे राहुल गांधी यांच्या यात्रेचा समारोप होणार असून ते सभा देखील घेणार आहेत.
भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल विधान केलं आहे. ‘सावरकर हे ब्रिटिशांची पेन्शन घेत होते. त्यांनी माफीनामा दिल्यानेच त्यांना सोडण्यात आलं, असं सांगत राहुल गांधी यांनी कागदपत्रच मीडियासमोर सादर केली. त्यामुळे त्यांच्यावर भाजप आणि मनसेने जोरदार टीका केली आहे. देशभरात भाजप आणि मनसेकडून राहुल गांधी यांचा निषेध करण्यात येत असून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील केले जात आहे. अनेक ठिकाणी राहुल गांधीविरुद्ध निवेदने देखील देण्यात आली आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा दि.२४ रोजी महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणार असून त्यापूर्वीच राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. राहुल गांधी मध्यप्रदेशात येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे. एका मिठाईच्या दुकानात पत्रं पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतली असून अज्ञात इसमाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.
दि.२४ रोजी राहुल गांधी मध्यप्रदेशातील इंदूर येथे जाणार आहे. त्यापूर्वीच हे धमकीचं पत्रं आलं आहे. हे पत्रं कुणी दिलं? पत्रं कधी आणून ठेवलं याबाबतची काहीच माहिती नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीला पकडणं पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असून भारत जोडो पदयात्रेत बंदोबस्त देखील वाढविण्यात येणार आहे.