⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

मोठी बातमी : बहुचर्चित घरकूल घोटाळा खटल्यात सरकारी वकील बदलणार!

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ राज्यात गाजलेल्या अनेक आर्थिक खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्याकडून अनेक खटले काढून घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे प्रवीण चव्हाण हे अडचणीत आले होते. दरम्यान, ॲड.प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्यात आलेल्या खटल्यांच्या यादीत सर्वात पहिला खटला जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजि क्रमांक १३/२००६ म्हणजेज घरकुल घोटाळा आहे. चव्हाण यांची नियुक्ती हटविण्यात आल्यानंतर लवकरच घरकुल खटल्यात नवीन सरकारी वकिलाची नेमणूक होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

जळगाव येथील घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि इतरांना शिक्षेपर्यंत पोहचवल्याने ॲड.प्रवीण चव्हाण हे नाव राज्यभर चर्चेत आले होते. राज्यातील अनेक महत्वाच्या खटल्यात प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे चव्हाण अडचणीत आले होते. नुकतेच सरकार बदल झाले असून राज्यात भाजप-शिवसेना शिंदे गट युतीचे सरकार आले आहे. राज्याच्या वरिष्ठ अधिकारी वैशाली पी.बोरुडे यांच्या सहीच्या दि.२१ सप्टेंबर रोजी निघालेल्या आदेशात महाराष्ट्र सरकारने ॲड.प्रवीण पी. चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द केल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडील तब्बल १९ खटले काढून घेण्यात आले आहे.

ॲड.प्रवीण चव्हाण यांच्याकडून काढून घेण्यात आलेल्या खटल्यांच्या यादीत सर्वात पहिला क्रमांक जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजि क्रमांक १३/२००६ म्हणजेज घरकुल घोटाळ्याचा आहे. घरकुल घोटाळ्यात ॲड.प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात अनेकदा जोरदार युक्तिवाद करीत सरकार पक्षाची बाजू मांडली होती. सरकार पक्षाच्या प्रभावी युक्तिवादामुळे माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह इतर अनेकांना शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. दरम्यान, सध्या अनेक आरोपी जामीनावर आहेत.

घरकुल घोटाळ्याच्या खटल्यातील ॲड.प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द झाल्याने लवकरच त्या खटल्यात नवीन सरकारी वकिलाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. चव्हाण यांची राज्यभरातील हडपसर, वानवडी, कोथरूड, डेक्कन, शिक्रापूर, आळंदी, शिवाजीनगर पुणे, सीताबर्डी नागपूर, कमिथी नागपूर, बंड गार्डन पुणे, लोणी काळभोर पुणे अशा तब्बल १९ गुन्ह्यातील नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. जळगावच्या घरकुल घोटाळ्याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. सध्या अनेक आरोपी प्रकृतीच्या कारणाने जामीनावर आहेत. नवीन कुणाची वर्णी लागणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.