मोठी बातमी : शिंदे गटातील आमदार, खासदारांना मिळणार ‘वाय प्लस’ सुरक्षा, मविआच्या पवार, ठाकरेंसह अनेक नेत्यांना वगळले

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांची सुरक्षा काही दिवसापूर्वी सरकारने रातोरात काढून घेतली होती. सरकारच्या या निर्णयानंतर अनेकांनी टीका केली होती. दरम्यान, नुकतेच एक बातमी समोर येत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कार्यभार असणाऱ्या गृह विभागाने शिंदे गटातील सर्व आमदार आणि खासदांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदे गटातील ४१ आमदार आणि १० लोकसभा खासदारांच्या सुरक्षेत वाढ होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार खासदारांना सुरक्षा देताना आणखी एक विषय समोर आला आहे. काही दिवसापूर्वीच सरकारने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला होती. वाय प्लस सुरक्षामधून सरकारने काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांना वगळले होते. तसेच सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पूर्वी त्यांना वाय प्लेस सुरक्षा मिळत होती तर आता त्यांना यापुढे एक्स दर्जाची सुरक्षा मिळणार आहे.

गृह विभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस आणि एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाय प्लस सुरक्षेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. शिंदेंना पाठिंबा देणाऱे रामटेक लोकसभा मतदारसंघातील खासदार कृपाल तुमाने यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांना झेड दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

जस्टीस के यु चांदिवाल यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित प्रकरणी त्यांनी चौकशी केली होती. दरम्यान भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ताफ्यासहित वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली असून, बॉलिवूड अभिनेता सलमान खानला वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांकडून आणि मविआ नेत्यांकडून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली जाणार हे निश्चित झाले आहे. सरकारच्या सुरक्षेबाबतच्या निर्णयावर अद्याप कुणीही आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.