⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मोठी बातमी : जळगाव मनपाचे ‘महापौर’ ललित कोल्हे!

मोठी बातमी : जळगाव मनपाचे ‘महापौर’ ललित कोल्हे!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मनपा आयुक्त सतीष कुलकर्णी तर उपमहापौर म्हणून गणेश सोनवणे यांचा उल्लेख

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । जळगाव मनपाचा भोंगळ कारभार सर्वांनाच माहिती आहे. जळगाव मनपा विकासाच्या दृष्टीने मागासलेली आहे यात तिळमात्र शंका नाही मात्र जे सहज शक्य आहे असे काम देखील मनपा करू शकलेली नाही. सांगायचं काय तर जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन आहेत हे सर्वांना माहिती आहे परंतु जळगाव मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर मात्र आजही महापौर म्हणून ललित विजयराव कोल्हे यांचेच नाव आहे. इतकंच काय तर उपमहापौर, मनपा आयुक्त, उपायुक्त यांची देखील नावे जुनीच आहेत. मनपाचे संकेतस्थळ अनेक महिन्यांनी सुरु झाल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्यापही ते अपडेट झालेले नाही.

जळगाव शहर महानगरपालिकेचे महापौर ललित विजयराव कोल्हे आहेत. हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल कारण जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर या जयश्री महाजन आहेत. मात्र ललित कोल्हे हे जळगाव शहर महानगरपालिकेचे महापौर आहेत अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून देण्यात येत आहे. जळगाव शहर महानगरपालिकेचा गलथान कारभार नागरिकांना पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. महापालिकेच्या गलथान कारभाराबाबत नागरिकांना काही नवीन ओळख करून देण्याची गरज नाही. कारण जळगाव शहरामध्ये असलेल्या सहज सोप्या समस्या देखील मनपाला सोडविता येत नाही.

http://www.jcmc.gov.in/english/mayor.html

गलथान कारभारामध्ये जर मनपाच्या आळशीपणाचे रूप पाहायचं असेल तर तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता तिथे अजूनही ललित विजयराव कोल्हे हेच जळगाव शहर महानगरपालिकेचे महापौर आहेत. ललित विजयराव कोल्हे हे २०१७ साली जळगाव शहर महानगरपालिकेचे महापौर होते. २०१८ ससाली सीमा भोळे या महानगरपालिकेच्या महापौर झाल्या तर त्यानंतर भारती सोनवणे या महानगरपालिकेच्या महापौर झाल्या होत्या. गेल्या वर्षी जयश्री महाजन महापौर झाल्या मात्र अधिकृत संकेतस्थळावर आजही त्यांना स्थान मिळाले नसल्याचे दिसून येते. मनपाच्या संकेतस्थळावर असलेले महापौर, उपमहापौर यांचा पर्याय उघडूच शकत नाही पण गुगलवर शोध घेऊन तपासले असता ललित कोल्हे यांचे नाव दाखविण्यात येते.

जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त हे अजूनही डॉ.सतीश कुलकर्णी आहेत. सध्या मनपा आयुक्त या डॉ.विद्या गायकवाड असून प्रशासनावर वचक असणाऱ्या आयुक्त म्हणून डॉ. विद्या गायकवाड यांची ओळख आहे. विद्या गायकवाड या नेहमीच शिस्तप्रिय असतात. मात्र आपल्याच अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यामध्ये त्या कमी पडत आहेत. संकेतस्थळावर अनेक पर्याय जुनेच असून त्याचा एक भाग म्हणजे मनपा आयुक्त आणि उपायुक्तांचे नाव चुकले आहे. एक हास्यास्पद बाब म्हणजे, जळगाव शहर महानगरपालिकेचे उपमहापौर महापालिकेनुसार अजूनही गणेश सोनवणे असल्याचे दाखविण्यात येत आहे. सध्या जळगाव शहर महानगरपालिकेचे उपमहापौर हे कुलभूषण पाटील आहेत मात्र अधिकृत संकेतस्थळानुसार २०१७ पासून गणेश सोनवणे हेच जळगाव शहर महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत

मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर अनेक चुका असून मनपात सादर करण्यात येत असलेला अर्थसंकल्प देखील २०१७ चा संकेतस्थळावर आहे. त्यानंतर एकही अर्थसंकलपाची माहिती देण्यात आली नाहीये. यामुळे एक मोठा भोंगळ कारभार नागरिकांसमोर आला आहे. गेल्या महासभेत देखील मनपाच्या संकेतस्थळाबाबत चर्चा झाली असून केवळ जुनी आणि अपडेट नसलेली माहिती जतन करून ठेवायची असेल तर त्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करून काय फायदा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह