मोठी बातमी : जिल्ह्यातून औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । मुंबई, कोकणात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. चाकरमान्यांना प्रवास करणे सोयीचे व्हावे म्हणून जळगाव जिल्ह्यातून १५० एसटी बसेस मुंबई विभागात पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई, शेगाव, अकोला या लांब पल्ल्यावर जाणाऱ्या निम्म्यापेक्षा जास्त बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी जळगाव एसटी विभागाचे दिवसाला १५ लाखांचे उत्पन्न बुडेल. प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबईच्या गणेशोत्सवासाठी जळगाव विभागातून १५० बसेसची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २६ ऑगस्टपासून १५० बसेस व ३०० चालक-वाहक ठाणे जिल्ह्यात रवाना झाले. या बसेसच्या नियंत्रणासाठी ३ सुपरवायझरही पाठवण्यात आले आहे. या बसेस १० सप्टेंबर रोजी परत येतील. म्हणजेच १६ दिवस बसेस मुंबईत सेवा देणार आहेत. या १६ दिवसांत जळगाव जिल्ह्याचे २ कोटी ४० लाख रुपयांचे उत्पन्न बुडणार आहे. तर औरंगाबाद, नाशिक, पुणे सारख्या मार्गावरील फेऱ्या रद्द केल्यामुळे स्थानिक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, स्थानिक प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुक्कामाला जाणाऱ्या एकूण बसेस पैकी केवळ १७ बस रद्द केल्या आहेत. त्यामुळे किंचित का असेना दिलासा मिळालेला आहे.
रद्द केलेल्या फेऱ्या
औरंगाबाद १२ फेऱ्या रद्द, पुणे ८, फेऱ्या रद्द, नाशिक ८ गाड्या रद्द, मुंबई ९ गाड्या रद्द, मेहकर ६ गाड्या रद्द, शेगाव ४ गाड्या रद्द, अकोला ३ गाड्या रद्द, चोपडा २० गाड्या रद्द, रावेर १३ गाड्या रद्द, चाळीसगाव ८ गाड्या रद्द.