⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

मोठी बातमी : अनिल अडकमोल यांचे रिपाई पक्षातून निलंबित

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२३ । भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना प्रकरणात घेतलेल्या भूमिकेबद्दल रिपाइं आठवले गटाने महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांना पक्षातून एक वर्षासाठी निलंबीत केले आहे.

नवीन बीजे मार्केट समोरच्या खासगी जागेत असलेली तथागत गौतम बुध्द यांची मूर्ती आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. रातोरात हा पुतळा हटविण्यासाठी पोलीस संरक्षण मागण्यात आल्याची बाब देखील आश्‍चर्यकारक ठरली होती. भल्या पहाटे झालेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली होती. यातून समाजबांधवांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनाला अखेर जैसे थे स्थिती करत आधीप्रमाणेच मूर्ती आणि पुतळा त्या ठिकाणी ठेवावा लागला होता.

या सर्व प्रकरणात समाजबांधवांचा रिपाइंचे आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यावर रोष दिसून आला होता. त्यांनी जागेचे मालक आणि प्रशासनाशी हातमिळवणी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. अनिल अडकमोल यांनी लागलीच याचे खंडण केले होते. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी ( भुसावळ ) यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप लावत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.

तर अनिल अडकमोल यांनी याला प्रत्युत्तर देत सूर्यवंशी यांच्यावरच प्रत्यारोप केले होते. यानंतर अडकमोल यांनी आपल्या कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करत आपली बदनामी करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, या सर्व प्रकारातून रिपाइं आठवले गटातील अंतर्गत कलह उफाळून आल्याचे दिसून आले होते. या पार्श्‍वभूमिवर आपल्या पक्षाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांना रिपाइं आठवले गट पक्षातून एक वर्षासाठी निलंबीत करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रमेश मकासरे आणि जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी केली आहे.