मोठी बातमी : जळगाव शहर मनपाचे ८ कोटी गेले खड्ड्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । थोडी अतिशयोक्ती वाटेल पण शहरातील प्रत्येक रस्त्यावर पदोपदी असलेले खड्डे एकेक करून मोजले तर ती संख्या कोटीच्या घरात नक्कीच जाईल. जनतेच्या कराच्या पैशातून हाेणारी ही उधळपट्टी नागरिकांच्या हितासाठी तर नाहीच उलट जीवाशी खेळणारी ठरते आहे.सन २०२१-२२ या वर्षात महानगरपालिकेने मक्तेदारामार्फत दुरुस्ती न करता मनपा स्तरावर दुरुस्तीचा निर्णय घेतला. त्यासाठी २० लाख रुपयांची खडी तर सुमारे ३० लाख रुपयांचे डांबर खरेदी केले. त्यामुळे गत आर्थिक वर्षातही सुमारे ५० लाख रुपये रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी खर्च करण्यात आले.
मनपाने २०१९-२० या आर्थिक वर्षात मनपाच्या यंत्रणेकडून रस्ते दुरुस्ती केली हाेती. यासाठी ५० ते ६० लाखांचा खर्च झाला हाेता. २०२०-२१ या वर्षी ऑक्टाेबरमध्ये १९ प्रभागांत खड्डे बुजवण्यासाठी प्रभागनिहाय ५० लाखांचे नियाेजन केले. साडेनऊ काेटींचे टेंडर प्रसिद्ध झाले. या टेंडरनुसार मार्च २०२१पर्यंत कार्यादेश दिल्यानंतर मार्च २०२२पर्यंत रस्ते दुरुस्ती केल्याची माहिती मनपाने दिली आहे. यात पाच ते सहा प्रभागात संपूर्ण रक्कम खर्च झाली; परंतु काही प्रभागांत ७० ते ८० टक्के निधी खर्च झाला. साडेनऊ काेटी रुपयांपैकी ७ काेटींचा निधी खड्डे बुजवण्यासाठी खर्च झाला.
खड्डे जळगावकरांसाठी आपत्ती ठरत असले तरी मक्तेदारांसाठी ते उत्पन्नाचे साधन झाले आहे. कारण गेल्या ३ वर्षात खड्डे बुजवण्यासाठी मनपाने ८ कोटी रुपये मक्तेदारांच्या खाद्यात घातले असून रस्त्यांची स्थिती जैसे थे तशीच आहे.
असा झाला खर्च
२०१९-२० ५० ते ६० लाख
२०२० -२१ ७ काेटी रुपये
२०२१-२२ ५० लाख रुपये