जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना वेळोवेळी डावलण्यात येत असून त्यांचे समर्थक देखील नाराज झाले आहेत. नुकतेच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या यादीत देखील पंकजांना संधी देण्यात आलेली नाही. पंकजा मुंडे यांनी यावर अद्याप कोणतेही मोठे वक्तव्य केलेले नसताना त्यांना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक वेगळाच प्रस्ताव दिला आहे. जलील यांनी पंकजा मुंडे यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढावा, असे म्हटले आहे. मराठवाड्यातील एक आक्रमक आणि प्रभावी नेतृत्व आणि ओबीसी समाजाचा मोठा जनाधार असूनही पंकजा मुंडेंना डावलण्यात येत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्येही आहे.
टीव्ही ९ सोबत बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले कि, पक्षाकडून वारंवार हेटाळणी सहन करण्यापेक्षा पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, असा प्रस्ताव मी दोन वेळेला दिला आहे. आतादेखील पंकजा भगिनींकडे मी यासंदर्भाने बोललो आहे. एवढंच नाही तर गरज पडल्यास एमआयएम पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहिली. तुम्हाला मदत करेल, असं आश्वासनही खा. जलील यांनी दिले आहे. पंकजा मुंडे या भाजपातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील एक प्रभावी नेत्या आहेत. भाजपातील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांनी घुसमट केली जात असल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा : Vidhan Parishad Election : खडसेंची क्रॉस वोटिंगवर मदार का राष्ट्रवादी मतांचा कोटा वाढविणार?
पंकजा मुंडे यांचे राज्यात मोठे वजन आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आज देखील पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पंकजा मुंडे यांचं मराठवाड्यात मोठं संघटन आहे. भाजपच्या त्या सक्रिय नेत्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील भाजपच्या अनेक कार्यक्रमांतून त्यांना डावलण्यात येत असल्याचं चित्र आहे. नुकतेच जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या यादीत देखील पंकजा मुंडे यांना भाजपने डावलले असून उमा खापरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. खा.इम्तियाज जलील यांनी दिलेल्या प्रस्तावावर पंकजा मुंडे यांनी खरच निर्णय घेतला तर आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा भाजपाला मोठा धक्का बसू शकतो.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे पंकजा मुंडे यांच्याशी जवळचे संबंध आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यापासून खडसे आणि मुंडे कुटुंबियांचे संबंध सर्वश्रुत आहेत. खडसे यांची देखील भाजपात घुसमट होत असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. पंकजा मुंडे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतलाच तर खडसे देखील त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव देऊ शकतात.