⁠ 
शनिवार, मे 4, 2024

Eknath Shinde Breaking : भाजपची एकनाथ शिंदे यांना मोठी ऑफर… मंत्रिपदाची होणार लयलूट!

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्याचे म्हटले जात असून राज्यातील सत्ता पालट होणार हे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच जनतेशी संवाद साधत मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे म्हटले होते. आज पुन्हा मुख्यमंत्री राज्यातील सचिवांशी चर्चा करणार असून त्यांचे आभार मानून राजीनामा देणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यात या सर्व घडामोडी घडत असताना गुवाहाटी येथे थांबलेल्या एकनाथ शिंदे गटाशी भाजपने संपर्क केला असून त्यांना मोठी ऑफर दिल्याची बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद तसेच त्यांच्या गटाला केंद्रात २ मंत्री पदे, राज्यात ७ कॅबीनेट आणि ५ राज्यमंत्री पद दिले जाणार असल्याची शक्यता आहे.

राज्यातील घडामोडींना प्रचंड वेग आला असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde ShivSena) गटाचे तुल्यबळ वाढतच चालले आहे. विधानसभेत एखादा वेगळा गट स्थापन करण्यासाठी आवश्यकता असलेली मॅजिक फिगर गाठण्यात एकनाथ शिंदे यांना जवळपास यश आले आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊन मिळाले असून आता खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, नुकतेच हाती आलेल्या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४१ आणि अपक्ष ६ असे ४७ आमदार तर उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ १४ आमदार राहिले आहेत. नुकतेच समोर येत असलेल्या वृत्तानुसार राज्यातील शिवसेनेच्या १८ पैकी १० खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते देखील शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नाराजीबाबत वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले होते मात्र तरीही त्यावर तोडगा न निघाल्याने ते विधान परिषद निवडणूक पार पडताच ११ आमदारांना घेऊन नॉट रिचेबल झाले होते. एकनाथ शिंदे हे अहमदाबादमार्गे सुरत येथील ला मेरिडियन हॉटेलला पोहचले होते. शिंदे गटाकडे सुरुवातीला ११ आमदार असल्याचे सांगण्यात येत होते पण सायंकाळपर्यंत हा आकडा २५ वर गेला होता. रात्री ला मेरिडियन हॉटेल सोडताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचा फोटोच त्यांनी प्रसार माध्यमांना दिला होता. आज समोर येत असलेल्या बातम्यांनुसार एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण गटात दिग्गज मंत्र्यांसह ४१ शिवसेना आमदार आणि ६ अपक्ष आमदार असे एकूण ४७ संख्याबळ आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Updates : एकनाथ शिंदेंकडून शिवसेना हायजॅक, शिंदे गटाकडे ४७ ते ठाकरेंकडे १४ आमदार

आपल्याकडे असलेल्या संख्याबळाच्या आधारावर एकनाथ शिंदे आज सायंकाळी राज्यपालांची वेळ घेऊन भाजपच्या सहकार्याने वेगळा गट स्थापनेचा दावा करू शकतात असे म्हटले जाते. शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांशी संपर्क करण्याची जबाबदारी ५ आमदारांवर सोपविण्यात आली असून मुंबईत राहून एक पदाधिकारी गळाला लागलेल्या आमदारांना गुवाहाटी येथे पोहचविण्याची व्यवस्था करीत आहे. एकनाथ शिंदे हे भाजपच्या संपर्कात असल्याचे पहिल्या दिवसापासून सांगण्यात येत आहे. नुकतेच समोर येत असलेल्या वृत्तानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता शंका उपस्थित करीत असून इतके आमदार कसे फुटले? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना मोठी ऑफर दिली असल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद, ७ कॅबीनेट मंत्रीपदे आणि ५ राज्य मंत्रीपदे दिले जाणार आहे. इतकेच काय तर खासदारांना देखील केंद्रात २ पदे मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.