जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२४ । देशात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या गोष्टीचाही अनेक जण गैर फायदा घेताना दिसत आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडविले जात असून या प्रकारच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना भुसावळमधून समोर आलीय. नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवीत चौघांनी वेळोवेळी १० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, भुसावळ येथील सरस्वतीनगर येथे राहणारे रवींद्र सोना अडकमोल वय ५५ यांचा मुलगा आशिष अडकमोल याला नाशिक येथील ओझर टाऊनशिपमध्ये असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिकस लिमिटेड कंपनीत लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आरोपी सुनील विश्वासराव पाटील रा. नंदुरबार, मनीषा उर्फ हर्षदा प्रदीप पवार (पाटील ) ,जयेश राजेंद्र पाटील ,प्रदीप यशवंत पवार सर्व रा. वावरे नगर नाशिक या चौघांनी १० डिसेंबर २०२२ ते २४ डिसेंबर २०२२ दरम्यान नंदुरबार ,भुसावळ ,नाशिक येथे वेळोवेळी रोख आणि फोन पे वर असे एकूण १० लाख रुपये घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर रवींद्र सोना अडकमोल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध ४ जुलै रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.