⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

भुसावळची तृतीयपंथी चांद पोलीस होण्यापासून एक पाऊल दूर..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२३ । राज्यात पोलीस भरतीची मैदानी परीक्षा पार पडली. यात भुसावळ येथील चांद सरवर तडवी (वय २७) ही उत्तीर्ण झाली आहे. धुळ्यातील पोलिस भरतीत राज्यातून ती एकमेव तृतीयपंथी उमेदवार म्हणून धावली व यशाला तिने गवसणी देखील घातली. आता पोलीस होण्यापासून ती फक्त एक पाऊल दूर आहे. ते म्हणजे तिची लेखी परीक्षा.

चांद हिचं बालपण ते पोलीस भरतीपर्यंतचा आयुष्याचा प्रवास काही सोपा नव्हता. आई वडील, दोन बहिणी व एक भाऊ असा चांद हिचा परिवार आहे. तृतीयपंथीय असल्यामुळे लहानपणी शाळा शिकताना मुले चांद हिला हिणवायचे. त्यामुळे चांद हिला शिक्षणासाठी अनेक शाळा बदलाव्या लागल्या. मात्र यात दहावीपर्यंत मजल गाठली व नंतर तिने ब्युटीपार्लरचा कोर्स करून फर्दापूरच्या महाविद्यालयात वाणिज्य विषयात पदवीचे शिक्षण ती घेत आहे.

एकीकडे शिक्षण घेत असताना चांदचा संघर्ष सुरू दुसरीकडे तिची आई जयबून तडवी हिला कॅन्सरने ग्रासले. चांद हिचे वडील रेल्वेत नोकरीला होते. मात्र कॅन्सरचा खर्च न पेलवणारा होता. आईवर पूर्ण उपचार व्हावेत यासाठी पैसे कमी पडू नये म्हणून चांद ही रस्त्यावर उतरली. आणि सुरू झाली चांदच्या आयुष्याशी परीक्षा.

कधी रेल्वेत पैसे मागून तर कधी जोगवा मागून तिने आपल्या परीने मदत केली. दिवसभरात मिळालेले पैसे चांद ही आईच्या उपचारासाठी घरी द्यायची. 2021 मध्ये आईच्या निधनानंतर बेबो पोरकी झाल्यानंतर जवाबदारी अधिकच वाढी मात्र दुसरीकडे शिक्षणाची जिद्द तिला स्वस्थ बसू देत नव्हती.

भुसावळातील चाँद उर्फ बेबोच्या आयुष्यात संकटांची मालिका तिच्या जन्मानंतरच सुरू झाली. वयाच्या दहाव्या वर्षी प्रेमात पडलेल्या चाँदला तृतीयपंथी असल्याचे सांगून बाजूला सारलं गेल्यानंतर तिच्या भोवतीची संकटांची मालिका थांबली नाही. मात्र ती डगमगली नाही. प्रत्येक संकटाला तिने धैर्याने तोंड दिले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांनाही सरकारी नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घ्यावे, असा निर्णय दिला. त्यानुसार राज्यात होत असलेल्या पोलीस भरतीसाठी धुळे जिल्हा पोलीस दलात शिपाई पदासाठी चांदने अर्ज भरला आहे. यात 50 पैकी 35 मार्क्स तिला मिळाले आहेत. आता जयश्री इंगळे यांच्या माध्यमातून समाधान तायडे यांच्या अकॅडमीत लेखी परीक्षेच्या अभ्यासासाठी तिने प्रवेश घेतला असून तायडे हे निशुल्क तिला मार्गदर्शन करीत आहेत.

चांदचे पोलीस होण्याचे स्वप्न आता फार दूर नाही. २ एप्रिलसा चांदची पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी तिचा कसून अभ्यास सुरू आहे. मी पोलीस होणारचं आणि आई वडिलांचं नाव रोशन करणारच, असं चांद आत्मविश्वासाने सांगते.