जळगाव लाईव्ह न्यूज : ३ जानेवारी २०२३ : मध्य रेल्वेत मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ असे पाच विभाग असून, भुसावळ रेल्वे विभाग आणि स्थानकाला मोठे महत्त्व आहे. भुसावळ रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक व भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणार्या सर्व गाड्या भुसावळमार्गे जातात. २४ तासांत भुसावळ रेल्वेस्थानकावरून तब्बल १३५ प्रवासी गाड्या धावतात. तर एका तासात आठ ते दहा मालगड्या येथून धावतात. गेल्यावर्षी भुसावळ विभागाने छप्परफाड कमाई केली आहे.
भुसावळ रेल्वे विभागाच्या वाणिज्य शाखेने डिसेंबर २०२२ मध्ये एकूण १२८ कोटी एक हजारांचा महसूल मिळाला आहे. मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेनमधील तिकीट विक्रीतून ६२ कोटी ९३ लाखांचे उत्पन्न मिळविले. तर मालगाडीतून पाठविलेल्या पार्सल, पदार्थ, सिमेंट, तेल, कोळसा, डिझेल, पेट्रोल आदी वस्तूंमधून ५६ कोटी ६६ लाख मिळविले. यासह पार्किंगच्या ठेक्यातून ३६ लाखांचे उत्पन्न मिळविले. नॉन फेअर कमाईमध्ये ५९ लाखांचे उत्पन्न मिळविले. खानपान विभागातून एक कोटी १८ लाखांचे उत्पन्न मिळाले.
फुकट्या प्रवाशांकडून वसूली
भुसावळ वाणिज्य विभागातर्फे डिसेंबरमध्ये विभागाचा महसूल वाढविण्यासाठी तीन प्रकारची चेकिंग मोहीम राबविण्यात आली. १७ डिसेंबरला मेगा तिकीट चेकिंग मोहीम राबविली. त्यात वाणिज्य निरीक्षक, तिकीट निरीक्षक, आरपीएफ स्टाफ यांच्या सहाय्याने २३ लाख २७ हजारांचा महसूल मिळविला. तीन हजार ९१५ केसेसमध्ये हा महसूल मिळाला. तसेच ३० डिसेंबरला खानपान, पार्किंग, वाणिज्य प्रसारमाध्यम, सफाई, पार्सल आणि पे अॅन्ड यूज यांच्यात अनियमितता आळल्याने २११ केसेस करून दहा लाख ४९ हजारांचा महसूल गोळा करण्यात आला.
नाशिक-देवळाली-भुसावळ गाडीची वेळ पूर्ववत करण्याची मागणी
कोरोना पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये पॅसेंजरसह सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर कोरोना कमी झाल्याने टप्याटप्याने बहुतांश गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र पॅसेंजर गाड्या बंद होत्या. त्याऐवजी मेमू गाड्या सुरु केल्या आहेत. नाशिक ते भुसावळ दरम्यान हजारो चाकरमने दररोज ये-जा करतात. यांच्या दृष्टीने नाशिक-देवळाली-भुसावळ शटल ही सर्वात महत्त्वाची गाडी होती. ही गाडी दोन वर्ष बंद राहिल्यानंतर देवळाली एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. मात्र सकाळी त्या गाडीची वेळ दररोज ये-जा करणार्यांच्या दृष्टीने गैरसोईचे आहे. याबाबत वारंवार मागणी करुनही गाडीच्या वेळेत बदल झालेला नाही.