जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२४ । भुसावळ-नंदुरबार रेल्वे पॅसेंजरची चेन पुलिंग करून सुमारे अर्धा तास पॅसेंजर थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सुदैवाने ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे

याबाबत असे की, काल १२ जुलै रोजी अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने हजारो भक्तांची गर्दी होती. भुसावळहुन नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून सकाळी ११ वाजता सुटली असताना रेल्वे मध्ये हजारो यात्रेकरू बसले.
काही यात्रेकरूंनी भोरटेक रेल्वे स्टेशन पूर्वी धार टेकडीच्या जवळ साखळी ओढल्याने रेल्वे जागेवर थांबली. हजारो यात्रेकरू त्याठिकाणी उतरले आणि काही समाज कंटकांनी रेल्वे वर दगडफेक केल्याचे समोर आले आहे.या दगडफेकीमुळे पॅसेंजर मध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचा एक व्हिडिओ हा सोशल मीडियाचा व्हायरल झाला आहे
दररोज भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरमधून हजारो प्रवासी प्रवास करतात. सर्वसामान्यांच्या वाहतुकीचे साधन म्हणून भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरची ओळख आहे. त्यातच या पॅसेंजरवर दगडफेक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही दगडफेक नेमकी का झाली? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दगडफेकीनंतर काही वेळाने ही रेल्वे पुढील प्रवासाला रवाना झाली.