भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई : रेशनचा दोन टन तांदुळ जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शहरातील बोंडे मटन हॉटेल समोरील राजेश ट्रेडींग या दुकानासमोर 20 हजार रुपये किंमतीचा दोन टन रेशनचा तांदुळ जप्त केला असून या प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात यापूर्वीदेखील अवैधरीत्या रेशनच्या तांदळाचा साठा करणार्यांवर कारवाई झाली असलीतरी माफियांना वरदहस्त असल्याने रेशनमालाची अवैधरीत्या होणारी वाहतूक अद्यापही थांबली नसल्याचे चित्र आहे.
भुसावळ शहरातील राजेश ट्रेडींग या दुकानाच्या बाहेर गुरूवार, 13 रोजी सायंकाळी 5.10 वाजता 407 हा टेम्पो (एम.एच.04 ई.वाय.4549) मध्ये रेशनचा तांदुळ असल्याची माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने धाव घेत टेम्पोची तपासणी केल्यानंतर त्यात रेशनचा 20 हजार रुपये किंमतीचा सुमारे दोन टन तांदुळ आढळल्याने तो जप्त करण्यात आला. पोलिसांनी वाहन जप्त केले असून या प्रकरणी पोलिस कर्मचारी सुभाष भागवत साबळे यांच्या फिर्यादीनुसार राहुल सुरेश चौधरी (प्रोफेसर कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला, जितेंद्र लोटू पाटील करीत आहेत.