चूक महावितरणची, भुर्दंड मात्र ग्राहकांना….

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२२ । भुसावळ शहरात वीज वितरण कंपनीचे ग्राहकांना वीजपुरवठ्यासह अव्वाच्या सव्वा बिल देऊन ‘शॉक’ देणे सुरूच आहे. कित्येक ग्राहकांचा विजेचा वापर कमी आहे अन् त्यांना बिल मात्र, प्रमाणापेक्षाही अधिक आले आहे. चार ते पाच आकडी बिलाच्या रक्कमेने ग्राहकांना घाम फोडला असून, वीज वितरण कंपनी ग्राहकांना लुटत आहे, अशी चर्चा आहे.

भुसावळ शहरात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. २०१९ साली जिनस कंपनीने भुसावळ शहरात आर एफ टेक्नॉलॉजीचे मीटर ग्राहकांच्या घरी बळजबरीने बसविले. त्यानंतर अनेक ठिकाणी वीज ग्राहकांना दुसऱ्याच ग्राहकाच्या नावाचे मीटर बसविण्यात आले आहे अश्या तक्रारी वाढल्यात.

अनेक ग्राहकांनी याबाबतीत तक्रार ही दाखल केल्यात परंतु अजूनही भुसावळ विभागातील शेकडो तक्रारी प्रलंबित आहे. वीज बिल सक्तीने वसुली करण्याची मोहीम महावितरणने सुरु केली असून वापर न केलेल्या रिडींगचे वीज देयके अदा करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना त्रास देत आहे. याबाबतची तक्रार प्रा. धिरज पाटील यांनी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तीन वर्षांपासून त्रास
भुसावळातील हुडको कॉलोनी परिसरातील वीज ग्राहकाला (११७७५४०६६९०८) तीन वर्षांपासून दुसऱ्याच ग्राहकाचे वीज देयक दिले जात आहे. वारंवार तक्रार दाखल केल्यानंतरही सुधारणा करण्यात आली नाही. दुसऱ्या ग्राहकाचा वापर जास्त आहे आणि आम्ही भाडयाच्या घरात राहतो. वीज देयक कसे भरणार याची काळजी सतावते. महावितरणच्या कर्मचाऱ्याला विचारणा केली तर जिनस कंपनी सुधारणा करीत नाही असे सांगतात, जिनस कंपनीच्या अधिकाऱ्याला विचारणा केली असता महावितरण सुधारणा करीत नाही असे सांगितले जाते. नक्की न्याय मागायचा कोणाला हेच समजत नाहीय?
-लतेश भारंबे, वीज वापरकर्ता