⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

खुशखबर..भुसावळ-कटनी पॅसेंजर ‘या’ तारखेपासून पुन्हा धावणार, पण..

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । कोरोनानंतर रेल्वे सुरळीत झाल्या असल्या तरी अनेक पॅसेंजर गाड्या अद्यापही बंद असल्याने प्रवाशांसह चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. दरम्यान, अशात आता भुसावळ-कटनी पॅसेंजर १ एप्रिलपासून पुन्हा रुळावर धावणार आहे. मात्र, या गाडीला एक्स्प्रेसचा दर्जा दिल्याने प्रवाशांना जादा पैसे माेजावे लागणार आहे. तसेच या गाडीचे ४ थांबे आता रद्द झाले आहेत. त्यामुळे एकीकडे दिलासा, तर दुसरीकडे प्रवाशांना आर्थिक झळ सहन करावी लागेल.तसेच गाडीच्या वेळेतही बदल करण्यात आल्याने चारकमान्यांची गैरसोय होईल. त्यामुळे ही गाडी सुरु होण्यापूर्वीच नाराजीचे सूर उमटत आहेत.

कोरोना पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून रेल्वेने सर्वच प्रवासी गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर टप्याटप्याने रेल्वे सुरळीत धावू लागल्या. मात्र, भुसावळ येथून धावणाऱ्या अनेक पॅसेंजर गाड्या अद्यापही बंद आहे. तसेच ज्या गाड्या सुरु आहेत त्यात अनारक्षित तिकिटावरच प्रवास करता येत आहे. यामुळे प्रवाशांनसह अप डाऊन करण्यासाठी लाईफ लाईन पॅसेंजर गाड्या बंद असल्यानं नागरिकांची गैरसोय होतेय. तसेच त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय.

दरम्यान, भुसावळ येथून सध्या पॅसेंजर ऐवजी मेमू गाड्या सुरु आहेत. मात्र, पॅसेंजर गाड्या सुरु करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. अशातच भुसावळ-कटनी पॅसेंजर १ एप्रिलपासून सुरु होत आहे. मात्र, पॅसेंजर ऐवजी ती एक्स्प्रेस म्हणून धावणार असल्याने ४ थांबे रद्द झाले आहेत. तसेच प्रवाशांना जादा पैसे माेजावे लागणार आहे.

वेळापत्रक असे : पूर्वीची वेळ हवी, अन्यथा नोकरदारांची होणार गैरसोय
भुसावळ-कटनी पॅसेंजर पूर्वी भुसावळ स्थानकावरून सकाळी ९.३० वाजता सुटत हाेती, ती पहाटे ३.२५ वाजता कटनी येथे पाेहोचत हाेती. तर कटनी येथून ही गाडी रात्री १०.२० वाजता सटून भुसावळात सायंकाळी पाचला पाेहोचत हाेती. नवीन गाडी भुसावळ येथून सकाळी ११.१० वाजता सुटून पहाटे ४.५० वाजता कटनीला पोहोचेल. तर परतीचा प्रवास रात्री ११.५० वाजता सुरू होऊन गाडी सायंकाळी ६.३५ वाजता भुसावळात पाेहोचेल.