जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२३ । दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं भुसावळ हादरलं आहे. भुसावळ शहरातील बालाजी लॉनमागील शगुन इस्टेटमध्ये रेल्वे कर्मचार्याने आपल्या वयोवृद्ध आईसह पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. आराध्या हेमंत भूषण (23) व सुशीलादेवी भूषण (63) अशी मयतांची नावे आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तथा रेल्वे कर्मचारी हेमंत श्रवणकुमार भूषण यास अटक करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे घटना?
संशयित हेमंत श्रवणकुमार भूषण हा भुसावळ रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. पत्नी आराध्या व आई सुशीलादेवी यांच्यासह तो वांजोळा रोड, बालाजी लॉजमागील शगुन इस्टेटमध्ये काही महिन्यांपूर्वीच वास्तव्यास आला होता. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच लग्न करून आणलेली पत्नी आवडत नसल्याने त्यातून रेल्वे कर्मचारी असलेल्या पतीचे सातत्याने खटके उडत होते व त्यातूनच मंगळवारी पहाटे दाम्पत्यात कडाक्याचे भांडण झाले व त्यात मध्यस्थी करणार्या आईचा व नंतर संतापात पत्नीचीदेखील आरोपी पतीने खून केला. या घटनेत दाम्पत्यातील मनमिटाव दूर करण्यासाठी आलेल्या शालकालादेखील गंभीर ईजा झाली आहे.
दरम्यान, या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. .घटनास्थळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड,सपोनि मंगेश गोंटला, हरिष भोये पोहचले असून चौकशीची चक्रे फिरवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी हेमंत कुमार भूषण याला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.