भुसावळ-देवळाली मेमूचे ‘हे’ आठ थांबे रद्द ; चाकरमान्यांची गैरसोय कायम
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । कोरोनाच्या (Covid 19) तब्बल अडीच वर्षानंतर भुसावळ – देवळाली (Bhusawal-Devalali) उद्या म्हणजेच १५ सप्टेंबरपासून पुन्हा रुळावर येणार आहे. मात्र, पूर्वीच्या शटलच्या जागेवर मेमू गाडी धावणार असल्याने तिकीट दरही जास्त असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक तिकीट दरांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच या गाडीचे ८ स्थानकांवरील थांबे रद्द करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये सर्वच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून भुसावळ-देवळाली शटल बंदच होती. मात्र तब्बल अडीच वर्षांनंतर ही गाडी १५ सप्टेंबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत येत आहे. मात्र, आता शटलच्या जागेवर ही गाडी मेमू स्वरुपात आणि एक्स्प्रेसचा दर्जा घेऊन धावणार आहे. गाडी क्रमांक 11114 ही गुरुवारी (दि.१५) सायंकाळी ५.३० वाजता देवळालीसाठी सुटेल. तर गाडी क्रमांक 11113 डाऊन देवळाली येथून ही गाडी १६ सप्टेंबरला सकाळी ७.२० वाजता भुसावळसाठी निघेल.
या ८ स्थानकावरील थांबे रद्द
वाघळी, ऊगाव, भादली, पिंपरखेड, पांझण, अस्वली, ओढा, समीट या स्थानकावरील गाडीचे थांबे रद्द केले आहेत. एका स्थानकावरून संबंधित गाडीची किमान २५ तिकीटे काढली गेली पाहिजे, तरच तेथे थांबा असताे. मात्र, ८ स्थानकांवर प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने थांबे रद्द केले आहेत.
दरम्यान, भुसावळ-देवळाली मेमू स्वरूपात धावणार असली तरी दुसरीकडे मात्र प्रवाशांना भुर्दंड देखील सहन करावा लागणार आहे. या गाडीला रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. यामुळे तिकीट दरात तब्बल ४० टक्के वाढ केली आहे. भुसावळहुन सुटणाऱ्या या देवळाली पॅसेंजरचे पूर्वी भुसावळ देवळालीपर्यंतचे तिकीट ५५ रूपये होते. मात्र, ४० टक्के तिकीट दरवाढीमुळे भुसावळ ते देवळालीचे तिकीट ५५ रुपयांवरून ९५ ते १०० रुपयांच्या घरात आकारण्यात येणार आहे. तसेच जळगाव ते चाळीसगावचे तिकीट हे पूर्वी २५ रूपये होते ते ५० रूपये होण्याची शक्यता आहे.
चाकरमान्यांची गैरसोय कायम
भुसावळ-देवळाली शटल ही मेमूच्या स्वरूपात धावणार आहे. असं असले तरी प्रवाशांची गैरसोय मात्र कायम राहणार आहे. कारण पूर्वी देवळाली येथून सुटणारी ही गाडी चाळीसगावला सकाळी ७.३० वाजेला, पाचोरा येथे सुमारे सकाळी ८.३० वाजेला जळगाव येथे ९.४५ वाजेच्या सुमारास तर भुसावळ येथे १०.३० वाजेच्या सुमारास पोहोचत होती. मात्र आता या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आल्याने चाकरमान्यांची मात्र गैरसोय कायम राहणार आहे.
भुसावळ-वर्धा शुक्रवारपासून
भुसावळ-वर्धा-भुसावळ (१११२१) ही गाडी देखील १६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ती दुपारी २.३० वाजता भुसावळ येथून सुटणार आहे. ही गाडी परतीच्या प्रवासात वर्धा येथून शनिवार (दि.१७) रात्री १२.५ वाजता सुटेल. ती सकाळी ७.२५ वाजता भुसावळात पाेहोचेल.