महापौरांच्या हस्ते प्रभाग १२ मध्ये रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । शहरातील प्रभाग १२ मध्ये रविवारी श्री साईबाबा मंदिराजवळ महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते नारळ फोडून रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. प्रभागातील ४ कॉलनीतील रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
जळगाव शहरात अनेक प्रभागात रस्ते व गटारींच्या कामाला सुरुवात झाली आहे. रविवारी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते श्री साईबाबा मंदिरात पूजन करून आणि नारळ फोडून कामाचे भूमिपूजन करण्यात आले. प्रसंगी मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन बरडे, अनंत जोशी आदींसह इतर नागरिक उपस्थित होते.
प्रभाग १२ मध्ये असलेल्या गुलमोहर कॉलनी, गुरुकुल कॉलनी, शिवराम कॉलनी, सुयोग कॉलनीतील मुख्य रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहे. प्रभागातील नागरसेवकांकडून नागरिकांना १०० टक्के सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते नेहमी प्रयत्न करीत असतात. कायम पाठपुरावा करून ते कामे मार्गी लावतात. प्रभागात सुरू होत असलेल्या रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण होतील अशी ग्वाही महापौर जयश्री महाजन यांनी दिली.
प्रभागातील काही महिला व नागरिकांनी गटारीबाबत तक्रार केली असता महापौर जयश्री महाजन यांनी लागलीच त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. नगरसेवक अनंत जोशी आणि नितीन बरडे यांच्याशी चर्चा करून गटारीतील सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने कसा होईल याबाबत कार्यवाही करण्याचे महापौरांनी सांगितले. तसेच काहीही समस्या असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन देखील महापौर जयश्री महाजन यांनी नागरिकांना केले.