मोठी बातमी : बीएचआर संबंधी मोठा निर्णय, १४१ बँकेतील १५० खाती गोठवली

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२३ । राज्यभर गाजलेल्या बीएचआर पतसंस्थेतील अपहार व फसवणूक प्रकरणी महाराष्ट्रात विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात ११ पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यात राज्य शासनाने बीएचआर संबंधित ३७ ठिकाणच्या मालमत्ता जप्त केल्या असून १४१ बँकांमधील १५० खाती गोठविण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय शनिवारी न्यायालयाला प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी दिली.
भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था ही एकेकारी राज्यात नावाजलेली पतसंस्था होती. मात्र, ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारल्या होत्या.

पण, ठेवीची मुदत पूर्ण होवूनही लाभासह ठेवी परत करण्यात आल्या नव्हत्या. म्हणून फसवणूक, कट कारस्थान आणि आर्थिक अपहार, ठेवीदारांच्या हिताच्या विरूध्द वागणे या अनुषंगाने बीएचआर प्रकरणी महाराष्ट्र विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. आता शासनाने श्रीगोंदा, तळेगाव, खेड, खडक, डेक्कन, शिलेगाव, सरकारवाडा, पिंप्री, अकलुज, इंदापूर आणि पाचोरा या ११ पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यात ८ डिसेंबर २०२२ रोजी शासकीय राजपत्र प्रसिध्द करून बीएचआर संस्थेच्या तसेच संस्थेच्या संचालकांच्या व इतर व्यक्तींच्या ठेवी आणि मालमत्ता यांची यादी प्रसिध्द करून त्या यादी मधील ठेवी व मालमत्ता जप्त केल्या आहेत.

उपविभागीय अधिका-यांची नियुक्ती
या जप्त केलेल्या ठेवी व मालमत्ता यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी (उपविभाग हवेल, जि.पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बँक खाती गोठविल्या…
सदर यादीनुसार बीएचआर संस्थेच्या तसेच प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यासह त्यांच्याशी संबंधित आर.बी.डायमंड, साची इन्फास्ट्रक्चर यांच्या राज्यभरातील १४१ बँकेतील १५० खाती गोठविण्यात आल्या आहेत.

यांच्या मालमत्ता जप्त
बीएचआर पतसंस्थेच्या २२ ठिकाणच्या तर प्रमोद रायसोनी यांच्या १२ ठिकाणच्या तसेच त्यांच्या पत्नी कल्पना रायसोनी यांच्यासह सुरजमल बभूतमल जैन, दिलीप कांतिलाल चोरडीया यांची प्रत्येकी १ ठिकाणची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याबाबतच निर्णय राज्य शासनाच्या गृह विभागाने ४ जानेवारी रोजी घेतला असून या निर्णयाच्या प्रती शनिवारी न्यायालयाला प्राप्त झाल्या आहेत.