जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । बीएचआर पतसंस्थेतील घोटाळा व कर्ज मॅचिंग प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जिल्ह्यासह राज्यात एकाचवेळी 15 पथकांनी छापेमारी करीत 12 दिग्गज्जांना ताब्यात घेतले. त्यात भुसावळातील भाजपाचे माजी नगरसेवक व गटनेता मुन्ना इब्राहीम तेली यांचा मुलगा आसीफ तेली याचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या कारवाईनंतर भुसावळातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. तेली यांना निवासस्थानावरून ताब्यात घेतल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणून त्यांची आधी चौकशी करण्यात आली व नंतर अँटीजन टेस्ट करून पथक त्यांना अटक करीत पुण्याला नेले.
50 लाखांच्या कर्ज प्रकरणी कारवाई
पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेतील तीन जणांच्या पथकाने गुरूवारी सकाळी आसीफ तेली यांना राहत्या घरातून चौकशीकामी ताब्यात घेत बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणले व तेथे काही तास स्वतंत्र खोलीत चौकशी केल्यानंतर अँटीजन टेस्ट केल्यानंतर त्यांना पुण्यात नेण्यात आले. बीएचआरचे धागेदोरे भुसावळपर्यंत आल्यानंतर यापुढे कारवाई कुणावर ? याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
50 लाखांच्या कर्जाची यापूर्वीच फेड : मुन्ना तेली
भाजपाचे तत्कालीन गटनेता तथा माजी नगरसेवक मुन्ना तेली म्हणाले की, बीएचआर पतसंस्थेतून आम्ही 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले मात्र यापूर्वीच त्याची आम्ही फेड केली आहे शिवाय दोन कोटींच्या मालमत्तेवर त्यासाठी बोजा बसवण्यात आला होता तो देखील उतरवण्यात आला आहे. चौकशीकामी मुलाला नेण्यात आले असून नेमकी कारवाई का झाली? हे सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले.