जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । तीन वर्षापूर्वीच विवाह झाला परंतु गैरसमजातून घटस्फोटाच्या टप्प्यावर आलेल्या संसाराला भोरगाव लेवा पंचायतीने पुन्हा एकदा योग्य वळणावर आणले आहे. आजच्या या घटनेतून सर्वच जात पंचायती सारख्या नसतात हे सिद्ध झाले आहे.
भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या वेगळ्या होणाऱ्या दाम्पत्यांना एकत्र आणून एक आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाचे समाजातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आसोदे येथील भूषण चिरमाडे व गोजोरे येथील कीर्ती उर्फ भारती यांचा २०१८ मध्ये विवाह झाला. विवाहानंतर एक वर्ष सर्व चांगले सुरळीत सुरू होते. पण हळूहळू त्यांच्यात लहान मोठ्या गोष्टींवरून वादविवाद सुरू झाले. या दरम्यान दाम्पत्याला एक गोंडस बाळसुध्दा झाले. पण छोट्या-छोट्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन कीर्ती बाळाला घेऊन माहेरी गोजोरे येथे आली.
काही दिवसांनी भुसावळ येथील भोरपंचायत कार्यालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. परंतु भोरगाव लेवा पंचायतीच्या सदस्यांनी समुपदेशन कक्षात कीर्ती व भूषण दोघांचे समुपदेशन केल्यानंतर दोघांनी घटस्फोटाचा विचार रद्द करुन एकत्र संसार करण्याची इच्छा व्यक्त केली.
यासाठी सचिव डाॅ.बाळू पाटील व अध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी अजय भोळे, समुपदेशन कक्षाच्या चेअरमन आरती चौधरी, सदस्य मंगला पाटील व जयश्री चौधरी आदी उपस्थित होते.