VIDEO : राज्यपाल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ; छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख?

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२३ । महाराष्ट्रात पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. “राज्यपालांकडून वारंवार अशी विधानं करण्यामागील कारण काय हे जरा महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिलं पाहिजे ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जबाबदारी आहे, असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.

अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर संबंधित व्हिडीओ ट्विटदेखील केलाय. “राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख. नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?”, असे प्रश्न अमोल मिटकरी यांनी व्हिडीओ ट्विट करत उपस्थित केले आहेत.

राज्यपालांचं नेमकं वक्तव्य काय?
राज्यपालांनी हिंदीत याबाबत एक वक्तव्य केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. “सब लोग कहते हैं की शिवाजी होने चाहीए, चंद्रशेखर होने चाहीए, भगतसिंह होने चाहीए, नेताजी होने चाहीए, लेकीन मेरे घरमें नही तो दुसरे के घरमे होने चाहीए”, असं विधान राज्यपाल संबंधित व्हिडीओत करताना दिसत आहेत.