जळगाव लाईव्ह न्यूज | १७ एप्रिल २०२३ | महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी उष्माघाताचा त्रास झाल्याने ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातही उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यात तापमान वाढीमुळे उष्णतेची लाट नसली तरी उष्ण वार्यांमुळे व असह्य उकाड्यामुळे उष्माघाताचे फटका बसून अनेकांना त्रास जाणवू लागले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या सरींमुळे उकाडा प्रचंड वाढला आहे. जळगावमध्ये रविवारी तापमान ४१ अंशांच्या पुढे होते. पुढील १५ दिवसात तापमानाचा पारा ४२ ते ४७ अंशावर जाण्याचा अंदाज असल्याने उष्माघातापासून बचावासाठी वेळीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
एप्रिल हिट हा जळगावकरांसाठी नवा प्रकार नसला तरी यंदा वातावरणातील बदलांमुळे उष्माघाताचे घातक रुप समोर येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पुढच्या १५ दिवसांमध्ये नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, यामुळे वातावरणात बदल जाणवला मात्र तोच बदल आता उष्णता वाढीसाठी कारणीभुत ठरत आहे. गत २४ तासांपासून तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. पश्चिमी भागातून येणार्या उष्ण वार्यांमुळे एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा ४२ ते ४७ अंशांवर राहण्याचा अंदाज वेधशाळांनी दिला आहे. २९ एप्रिल रोजी उच्चांकी ४७ अंशावर तापमान पोहोचण्याचा अंदाज आहे.
उष्माघाताची ही लक्षणे दिसताच करा प्रथमोपचार
चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे, शरीराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे, ताप १०६ डिग्रीवर पोहोचणे, कातडी गरम व कोरडी पडणे, नाडीचे ठोके वेगात व जोरात, घाम न येणे, अर्धवट शुद्ध हरपणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. कुणालाही ही लक्षणे दिसताच. वेळीच प्रथमोपचार करण्याची आवश्यकता आहे. तसेच या दिवसांमध्ये प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शक्यतो दुपारच्यावेळी उन्हात बाहेर जाणे टाळावे. आवश्यता असल्यास बाहेर पडतांना डोक्याला व कानाला रुमाल बांधा, उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका, जास्त त्रास जाणवल्यास लगेच डॉक्टरांकडे जा.