जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चिनू पोपली या 39 वर्षे तरुणाची 3,400 रुपयांच्या वादातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. तीन अज्ञातांनी गोळीबार करीत हत्या केल्याने कुमार नगर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रात्री तपासाची सूत्र फिरवत दोन संशयितांना अटक केली आहे.

धुळे शहरातील कुमार नगर भागात चिनू पोपली हा कुटुंबासह वास्तव्य करतो. शुक्रवारी रात्री चिनू घरी नसताना त्याच्या पत्नी सोनल पोपली यांना दोन संशयितांनी तुमचा पती कुठे गेला आहे. अशी विचारणा केली. पत्नीने सांगितले की ते बाहेर गेले आहे. दोन्ही संशयित दुचाकी वरुन निघून गेले. त्यानंतर सोनल यांनी पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. थोड्या वेळाने चिनू घरी आला.
चिनू घरी आल्याचे कळताच दुचाकीने तिघे जण आले. चिनू आणि तिघा संशयितांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की संशयितांनी आपल्या जवळचे रिव्हॉल्वर काढून चिनू पोपलीवर गोळीबार केला. गोळी थेट चिनू याचा छातीवर जाऊन लागली. त्यात चिनूचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत अवघ्या काही तासात संशयित यासीन पठाण आणि भटू चौधरी या दोन संशयितांना अटक केली.