जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२५ । मागच्या काही दिवसात झालेल्या घसरणीनंतर केळीच्या दरात सुधारणा झाली होती. यानंतर नवरात्रीत भाव आणखी वाढतील अशी अपेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून केळीचे दर सुमारे ९०० रूपयांनी घसरले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

रक्षाबंधनापूर्वी केळीदर बऱ्यापैकी होते. कमाल दरपातळी २१०० रुपये प्रति क्विंटल, अशी होती. परंतु यानंतर केळी दरात सतत घसरण झाली आहे. केळीचे दर घसरण्यास सततचा पाऊस आणि त्यामुळे विस्कळीत झालेली उत्तर भारतातील वाहतूक व्यवस्था कारणीभूत ठरल्याचे कारण व्यापारी देत होते.

प्रत्यक्षात, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून बऱ्यापैकी पावसाळी वातावरण निवळल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. उत्तर भारतातील काही राज्यांत केळी पाठविण्यात येणारे अडथळे दूर झाले. नवरात्रोत्सव जवळ आल्याने केळीच्या मागणीत आणखी वाढ झाली. या सर्व परिस्थितीमुळे ११५१ रूपयांपर्यंत खाली आलेले केळीचे दर १७ सप्टेंबर रोजी कमाल १८५१ रूपयांपर्यंत पोहोचले होते. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला.
मात्र, आता बऱ्हाणपूर बाजार समितीत बुधवारी कमाल ९२७ रूपये प्रति क्विंटलचा दर केळीला मिळाला. विशेष नवरात्रोत्सवातील उपवासामुळे केळीला मागणी असते. मात्र ही वाढती मागणी लक्षात घेऊन खरेदीसाठी पुढे आलेल्या व्यापाऱ्यांची संख्या रोडावताच केळीचे दर खालावल्याचे दिसून येत आहे. आठच दिवसात जवळपास ९०० रूपयांनी दर कमी झाले आहे. ऐन नवरात्रोत्सव व सणासुदीच्या दिवसांत भाव वाढण्याची अपेक्षा असताना भाव घसरत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.







